मधमाशांच्या हल्ल्यात २ महिला गंभीर जखमी : ठाणेगाव शेत परिसरातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : तालुक्यातील ठाणेगाव येथे भात कापणीसाठी शेतात गेलेल्या दोन महिलांवर अचानक मधमाशांच्या थव्याने हल्ला केला. या घटनेत ठाणेगाव येथील रहिवासी प्रतिभा बंडू नैताम ४० वर्ष आणि पुष्पा प्रकाश जुआरे ३९ वर्ष यांचा समावेश आहे. दोन्ही जखमी महिलांना उपचारासाठी आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे ८ वाजता प्रतिभा नैताम आणि पुष्पा जुआरे भात कापणीसाठी शेतात गेल्या होत्या. दोन्ही महिला शेतात काम करत असतानाच अचानक मधमाशांच्या थव्याने त्यांच्यावर हल्ला केला. मधमाशांच्या डंखापासून वाचण्यासाठी दोघींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र मधमाशांनी पाठलाग करून त्यांना अनेक ठिकाणी डंख मारले, ज्यामुळे दोघी जखमी झाल्या.
घटनेनंतर प्रतिभा नैताम यांनी मोबाईल फोनद्वारे उमेश जुआरे यांना याची माहिती दिली. माहिती मिळताच उमेश जुआरे तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही महिलांना मदत करून उपचारासाठी आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या शेतामध्ये भात कापणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांची शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू आहे. अशा परिस्थितीत मधमाशांच्या हल्ल्याच्या या घटनेने शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढवली आहे.




Petrol Price




