दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई


- ८ लाख ५९ हजार रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, भंडारा कार्यालयामार्फत विविध आस्थापनांची तपासणी व कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ८ लाख ५९ हजार रुपये किमतीचा ३७८.२१० किलो प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांची गुणवत्ता व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत दुध व दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मिठाई व फरसाण यांचे २१८ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. तसेच २०१ सर्वेक्षण नमुनेही विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.
मिठाई विक्रेत्यांवर कारवाई -
जिल्ह्यातील मिठाईच्या पेढ्यांची तपासणी करून आढळलेल्या त्रुटींच्या अनुषंगाने एकूण ६८ पेढ्यांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच सात उत्पादक आणि दोन हॉटेल्स अशा एकूण नऊ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींच्या आधारे ४४ पेढ्यांना एकूण २ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय आठ पेढ्यांमधून ४ हजार २५५ किलो अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, या साठ्याची किंमत ५ लाख ८७ हजार रुपये आहे.
प्राप्त ४७ तक्रारींवर कार्यवाही -
अन्न व औषध प्रशासनाकडे विविध माध्यमांद्वारे आतापर्यंत एकूण ४७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व तक्रारींच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आली आहे. यासोबतच सणासुदीच्या विशेष मोहिमा, स्ट्रीट वेंडर तपासणी मोहीम, यात्रा तपासणी आणि दूध तपासणी मोहीम आदी उपक्रमांतर्गतही तपासण्या करण्यात आल्या आहेत.अन्न सुरक्षा आयुक्त, मुंबई यांच्याकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या निर्देशांनुसारही प्रशासनामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती सहायक आयुक्त (अन्न) निलेश रा. ताथोड यांनी दिली.
नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना दक्षता घ्यावी -
दिवाळीच्या सणानिमित्त नागरिकांनी मिठाई, फरसाण व इतर खाद्यपदार्थ खरेदी करताना पॅकिंगवरील उत्पादन तारीख, वापरण्याची अंतिम तारीख, घटक पदार्थ, उत्पादकाचे नाव आणि FSSAI परवाना क्रमांक तपासावा. मिठाई व फरसाण ताजे, स्वच्छ आणि योग्यरीत्या साठवलेले असल्याची खात्री करावी.
उघड्यावर ठेवलेले, अस्वच्छ परिस्थितीत तयार केलेले, दुर्गंधीयुक्त किंवा अनावश्यक रंगाचा वापर केलेले खाद्यपदार्थ खरेदी करणे टाळावे. नागरिकांनी अधिकृत परवानाधारक अथवा नोंदणीकृत विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थ खरेदी करावेत व खरेदीचे बिल अवश्य घ्यावे. खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा भेसळीबाबत संशय आल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे लेखी अथवा ऑनलाइन पोर्टलद्वारे तक्रार नोंदवावी.
अन्न व्यावसायिकांनी सर्व नियम व सूचनांचे काटेकोर पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.नागरिकांनी सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाचा आग्रह धरून आनंददायी व आरोग्यदायी दिवाळी साजरी करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.




Petrol Price




