महत्वाच्या बातम्या

 नागपूर जिल्ह्यात दोन लाखाहून अधिक नवमतदारांची नोंदणी : राज्यात तिसरा क्रमांक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : १६ एप्रिलनंतर लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. जिल्हा निवडणूक विभागाने राबविलेल्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रमात जिल्ह्यात तब्बल दोन लाख १० हजार ५९५ नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

मंगळवारी पत्रकार परिषदेत नव्याने नाव नोंदवलेल्या मतदारांची संख्या जिल्हा निवडणूकअधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जाहीर केली.

मिशन युवा एन २०२३-२४ कार्यक्रमातून राबविलेल्या १८ ते १९ वयोगटातील नवमतदार नोंदणी करण्याचे नागपूर जिल्ह्याला ७५ हजार मतदार नोंदणीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. मंगळवार पर्यंत ८८ हजार ४४९ मतदारांची नोंदणी करण्यात आली. निवडणुकीत नवीन मतदारांचा कौल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे नवमतदारांच्या सर्वाधिक नोंदणीत नागपूरचा राज्यात तिसरा क्रमांक लागला आहे.

वयाची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या युवकांनी मतदार यादीत नाव नोंदवावे म्हणून जिल्हा प्रशासनाने अनेक उपक्रम हाती घतले होते. महाविद्यालयांमध्ये यासाठी विशेष शिबीर घेण्यात आले. १७ वर्ष पूर्ण करणाऱ्या युवकांकडूनही नोंदणी अर्ज भरून घेण्यात आले. मात्र त्यांचे नाव त्यांनी १८ वर्ष पूर्ण केल्यावरच मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे. सध्या सर्वच पक्षाकडून तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर १८ ते १९ वर्ष वयोगटातील मतदारांची संख्या महत्वाची ठरते. नागपूर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन (नागपूर, रामटेक) आणि विधानसभेच्या १२ जागा आहेत. यात नागपूर शहरातील सहा तर ग्रामीणमधील सहा जागांचा समावेश आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos