महत्वाच्या बातम्या

 सूरनदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू


- खोहगाव परिसरातील घटना; पोलिसांच्या शोधमोहिमेनंतर सापडला मृतदेह

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : मोहाडी तालुक्यातील खोहगाव परिसरातील सूरनदीत पोहण्यासाठी गेलेल्या वरठी येथील आबिद सत्तार शेख (३२, रा. शास्त्री वॉर्ड, वरठी) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. जेवणानंतर नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या आबिद यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात बुडाले. या घटनेने वरठी परिसरात शोककळा पसरली आहे.

मित्रांसोबत नदीकाठी गेले होते -
आबिद शेख हे अथर्व सम्राट लोणारे (१७) आणि कुणाल देवचंद लोणारे (३०), दोघेही शास्त्री वॉर्ड, वरठी येथील रहिवासी, यांच्यासोबत खोहगाव येथील सूरनदीच्या काठावर गेले होते. तिघांनी नदीकाठी स्वयंपाक करून जेवण केले. जेवण झाल्यानंतर आबिद शेख पोहण्यासाठी नदीत उतरले.

मात्र, नदीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा अचानक पाय घसरला आणि ते पाण्यात बुडाले. आबिद बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या मित्रांनी आरडाओरड करून मदतीसाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांना वाचविण्यापूर्वीच आबिद पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले.

पोलिसांची शोधमोहीम; मृतदेह बाहेर काढला -
घटनेची माहिती मिळताच वरठी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. नदी परिसरात शोध घेण्यात आला; मात्र सुरुवातीला आबिद यांचा मृतदेह हाती लागला नाही. त्यानंतर पोलिसांनी नदीत शोधमोहीम राबविली. अथक प्रयत्नांनंतर आबिद यांचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला.

आनंदाचे काही क्षण घालविण्यासाठी मित्रांसोबत गेलेल्या आबिद यांचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.

कुटुंबाचा एकमेव आधार हरपला -
आबिद शेख हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच वर्षांचा मुलगा आणि दोन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. घरातील कर्त्या व्यक्तीच्या आकस्मिक निधनामुळे शेख कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

दोन लहान मुलांच्या संगोपनासह कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा गंभीर प्रश्न आता त्यांच्या कुटुंबीयांसमोर निर्माण झाला आहे. आबिद यांच्या निधनाने कुटुंबीयांसह नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिस तपास सुरू -
या घटनेचा पुढील तपास वरठी पोलिस ठाण्याचे ठाणेदार सचिन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांकडून घटनेची आवश्यक ती चौकशी व कार्यवाही करण्यात येत आहे.





  Print






Related Photos