गोवंशाची अवैध वाहतूक करणारी दोन वाहने जप्त


- बेटाळा शेतशिवारात पोलिसांची कारवाई; १९ गोवंश जनावरांची सुटका, १८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : मोहाडी पोलिस स्टेशन हद्दीत कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांची अवैध व क्रूरपणे वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ३ ऑक्टोबर २०२६ रोजी मौजा बेटाळा येथील शेतशिवार परिसरात कारवाई केली. पोलिसांनी एकापाठोपाठ एक अशा दोन स्वतंत्र कारवाया करून महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनांमधून दाटीवाटीने वाहतूक करण्यात येत असलेल्या एकूण १९ गोवंश जनावरांची सुटका केली.
या कारवाईत पोलिसांनी दोन महिंद्रा बोलेरो पिकअप वाहने आणि १९ गोवंश जनावरे असा एकूण १८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही वाहनांचे चालक मात्र कारवाईदरम्यान वाहन सोडून फरार झाले असून, मोहाडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
दोन स्वतंत्र कारवायांत १९ जनावरांची सुटका -
बेटाळा शेतशिवार परिसरात पोलिसांनी केलेल्या पहिल्या कारवाईत एका महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनातून ९ गोवंश जनावरे आढळून आली. जनावरांना वाहनामध्ये अत्यंत दाटीवाटीने कोंबून, कोणतीही योग्य व्यवस्था न करता वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
यानंतर करण्यात आलेल्या दुसऱ्या कारवाईत आणखी एका महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनातून १० गोवंश जनावरे आढळून आली. या जनावरांनाही दाटीवाटीने कोंबून वाहतूक करण्यात येत होती. दोन्ही वाहनांमधील जनावरांना चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचे समोर आले.
१८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त -
पोलिसांनी दोन्ही कारवायांमध्ये एकूण १९ गोवंश जनावरे, ज्यांची किंमत सुमारे १ लाख ४० हजार रुपये, तसेच सुमारे १६ लाख रुपये किमतीची दोन महिंद्रा बोलेरो पिकअप वाहने जप्त केली आहेत. अशाप्रकारे पोलिसांनी एकूण १८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
चालकांचा शोध सुरू -
पोलिसांची कारवाई सुरू होताच दोन्ही वाहनांचे चालक वाहने घटनास्थळी सोडून फरार झाले. त्यामुळे मोहाडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून फरार चालकांचा शोध सुरू केला आहे. गोवंश जनावरांची अशा प्रकारे अवैध व निर्दयपणे वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहेत. बेटाळा परिसरात एकाच दिवशी करण्यात आलेल्या या सलग कारवायांमुळे अवैध गोवंश वाहतुकीच्या प्रकारावर पोलिसांचे लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे.




Petrol Price




