महत्वाच्या बातम्या

 सेवेच्या आठवणींनी डोळे पाणावले : कला पिंपळशेंडे यांचा भावपूर्ण सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : मोहसीन जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सेविका  कला ईश्वर पिंपळशेंडे यांच्या सेवानिवृत्तीचा क्षण विद्यालय परिवारासाठी भावूक करणारा ठरला. वर्षानुवर्षे विद्यालयाच्या सेवेत योगदान देणाऱ्या कला च्या कार्याचा गौरव करत भावपूर्ण वातावरणात त्यांचा सत्कार समारंभ पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या असमा खान खलिदी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून बल्लारपूर सेवा समितीचे सहसचिव इब्राहिम जव्हेरी उपस्थित होते. यावेळी पर्यवेक्षिका सुनीता कांबळे, मुख्याध्यापिका हर्षा वरगंटीवार, सत्कारमूर्ती कला पिंपळशेंडे, त्यांचे पती ईश्वर पिंपळशेंडे तसेच आप्तस्वकीय उपस्थित होते.

प्रमुख अतिथी इब्राहिम जव्हेरी यांच्या हस्ते कला पिंपळशेंडे यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी विद्यालयासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करत जव्हेरी यांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महिलांना शिक्षित व सक्षम करणे ही काळाची गरज असून, भावी पिढी घडविण्यात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्याध्यापिका हर्षा वरगंटीवार, पर्यवेक्षिका सुनीता कांबळे, शिक्षक प्रशांत बनकर, संजय ठोंबरे आणि सुनीलभाऊ यांनी कलाताईंच्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे, प्रेमळ स्वभावाचे आणि विद्यालयातील योगदानाचे स्मरण करत त्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या असमा खान यांनी कलाताई पिंपळशेंडे यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा गौरव केला. विद्यालयाच्या वाटचालीत त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, असे सांगत सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदी, निरोगी आणि सुखसमृद्धीचे जावे, अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ज्ञानेश्वर पवार यांनी केले. यावेळी इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्षानुवर्षे जपलेल्या सेवाभावाला कृतज्ञतेची मानवंदना देत कलाताई पिंपळशेंडे यांना विद्यालय परिवाराने भावपूर्ण निरोप दिला.





  Print






Related Photos