महत्वाच्या बातम्या

 डमी प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांवर कठोर कारवाईची मागणी


- उद्धवसेनेचे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : प्रत्यक्ष तपासणी करून कारवाई करण्याची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : अकरावी आणि बारावीच्या प्रवेश प्रक्रियेत काही कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारून डमी प्रवेश दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, अशा महाविद्यालयांची प्रत्यक्ष तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी उद्धवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात करण्यात आलेल्या आरोपानुसार, काही संस्थाचालक विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारून प्रवेश देतात. मात्र, प्रवेश घेतलेले विद्यार्थी नियमितपणे महाविद्यालयात उपस्थित राहत नाहीत. हे विद्यार्थी दिवसातील सात ते आठ तास खासगी कोचिंग क्लासेसमध्ये उपस्थित राहतात आणि केवळ प्रात्यक्षिक परीक्षांच्या वेळी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

काही कनिष्ठ महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस यांच्यात परस्पर समन्वय किंवा टाय-अप असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

बायोमेट्रिक हजेरीचे पालन होतेय का -

राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने यावर्षीपासून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक हजेरीची पद्धत सुरू केली आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात ‘डमी प्रवेश’ होत असल्याचा आरोप असलेल्या काही कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरीच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. तसेच संबंधित महाविद्यालयांमध्ये नियमानुसार शिक्षक आणि इतर कर्मचारी नियुक्त केले जात नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. केवळ औपचारिकता म्हणून महाविद्यालय सुरू ठेवून विद्यार्थ्यांना ‘डमी प्रवेश’ देत आर्थिक व्यवहार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकाराची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रत्यक्ष तपासणी करून कारवाईची मागणी -

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांची प्रत्यक्ष तपासणी करावी. विद्यार्थ्यांची उपस्थिती, बायोमेट्रिक हजेरी, शिक्षक व कर्मचारी नियुक्ती, महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा तसेच प्रवेश प्रक्रियेची पडताळणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित संस्थांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी उद्धवसेनेने केली आहे. निवेदन देताना जिल्हा संघटक प्रमोद भोमले, संजय पांडे, पंकज सत्यकार, राजू पाथरकर, वासुदेव जाधव, गजू जाधव, अशोक राऊत, गजानन साळवे, रमेश दिवटे, प्रमोद पांडे, प्रदीप मस्के, श्याम परसोडकर आदी उपस्थित होते.





  Print






Related Photos