महत्वाच्या बातम्या

 तडीपारचा आदेश झुगारून बल्लारपुरात वावर : आरोपी वर पोलिसांची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला इसम पुन्हा बल्लारपूर परिसरात बिनधास्तपणे फिरताना आढळून आल्याने बल्लारशाह पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. योगेश शंकर येरोल २५ वर्ष रा. रविंद्रनगर वॉर्ड, बल्लारपूर, असे कारवाई करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कलम १४२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी बल्लारशाह पोलिसांचे पथक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना सीएचएल डायल ११२ वरून एक इसम ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे धामधूम करून डॉक्टरसोबत हुज्जत घालत असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक उमेश दिगंबर जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी योगेश येरोल हा परिसरात फिरताना पोलिसांना आढळून आला. चौकशी केली असता तो पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार असून, त्याला चंद्रपूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची ओळख पटविली.

पोलिसांच्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या कार्यालयीन आदेशान्वये १८ मे २०२६ रोजी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अंतर्गत योगेश येरोल याला चंद्रपूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. २३ मे रोजी त्याला आदेशाची बजावणी करून तेलंगणातील जनकपूर, जिल्हा आसिफाबाद येथे सोडण्यात आले होते.

मात्र, हद्दपारीचा आदेश कायम असतानाही तो कोणतीही परवानगी अथवा सक्षम अधिकाऱ्याचा आदेश न घेता बल्लारपूर परिसरात परतल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले. जिल्ह्यात प्रवेश करण्याचे कारण विचारले असता त्याने कोणतेही उपयुक्त कारण किंवा परवानगीपत्र सादर केले नाही. हद्दपारीचा आदेश धाब्यावर बसवून जिल्ह्यात परतलेल्या इसमावर पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला असून, या कारवाईमुळे पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगारांवर बारकाईने नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.





  Print






Related Photos