महत्वाच्या बातम्या

 सेवा संकल्प अभियानातून आदिवासी बांधवांचे वनहक्कविषयक प्रश्न निकाली काढावेत - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत आदिवासी बांधवांचे वनहक्कविषयक प्रलंबित प्रश्न प्राधान्याने आणि कालबद्ध पद्धतीने निकाली काढावेत, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. सेवा संकल्प अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात आदिवासी विकास मंत्री यांच्या समिती कक्षात आयोजित बैठकीत मंत्री बावनकुळे बोलत होते.


महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, अभियानादरम्यान पात्र आदिवासी बांधवांना वनहक्क पट्ट्यांचे वितरण करावे. यापूर्वी वितरित केलेल्या पट्ट्यांमधील त्रुटी दुरुस्त करून संबंधितांना ७/१२ नमुने उपलब्ध करून द्यावेत. आदिवासी बांधवांच्या मालमत्तांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याची कार्यवाहीही प्राधान्याने पूर्ण करावी.

वनहक्क पट्ट्यांच्या नियमितीकरणाबाबत एमआरसॅकच्या उपलब्ध डेटाचा वापर करून निर्णय घ्यावा. ग्रामस्तरीय समित्यांनी मंजूर केलेले वन पट्ट्यांबाबत प्राप्त दावे व हरकतींचे नियमानुसार पुनर्विलोकन करावे. अन्नसुरक्षा समित्यांची स्थापना करण्याची कार्यवाहीही तातडीने पूर्ण करावी. मंत्रालय स्तरावर उपविभागीय अधिकारी यांची बैठक घेऊन संबंधित आमदारांना अभियानांतर्गत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती द्यावी, अशा सूचनाही मंत्री बावनकुळे यांनी दिल्या.





  Print






Related Photos