शेतातील कुंपणावर वीजवाहिनीची तार पडली : विजेच्या धक्क्याने जावयाचा मृत्यू


- हिंगणी येथील दुर्दैवी घटना; कुंपणाच्या तारा व्यवस्थित करताना महेश टापरे यांना जीव गमवावा लागला
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : सासऱ्याच्या शेतातील कुंपणाच्या तारा व्यवस्थित करीत असताना अचानक वीजवाहिनीची तार तुटून लोखंडी कुंपणावर पडली. त्यामुळे कुंपणामध्ये वीजप्रवाह उतरल्याने विजेचा जोरदार धक्का बसून जावयाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी हिंगणी येथे घडली. या घटनेमुळे मुडे आणि टापरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या दुर्घटनेत महेश टापरे ४० यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, महेश टापरे हे रविवारी त्यांचे सासरे चंद्रभान मुडे यांच्या शेतात गेले होते. शेतातील कुंपणाच्या लोखंडी तारा व्यवस्थित करण्याचे काम ते करीत होते. याचवेळी शेतावरून गेलेली वीजवाहिनीची तार अचानक तुटली.
तुटलेली वीजवाहिनीची तार थेट शेतातील लोखंडी कुंपणाच्या तारांवर पडली. त्यामुळे संपूर्ण कुंपणामध्ये वीजप्रवाह उतरला. याची कल्पना नसताना कुंपणाच्या तारांना हात लागल्याने महेश टापरे यांना विजेचा जोरदार धक्का बसला. धक्का इतका तीव्र होता की ते खाली कोसळले. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. कुटुंबीयांनी तत्काळ सेलू पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.
महेश टापरे यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे मुडे व टापरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे शेतशिवारातून जाणाऱ्या वीजवाहिन्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, वीजवाहिन्यांची नियमित पाहणी व देखभाल करण्याची गरज व्यक्त होत आहे.




Petrol Price




