एसएनडीटी विद्यापीठ शिक्षकांच्या ऋणाची जाणीव : विद्यार्थिनींनी केला गुरूंचा सन्मान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : ज्ञानाची वाट दाखविणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर आवारातील विद्यार्थिनींनी शिक्षक दिन उत्साहात साजरा केला. विद्यार्थिनींनी स्वतः पुढाकार घेत सांस्कृतिक कार्यक्रम, विविध मनोरंजक खेळ आणि स्पर्धांचे आयोजन करून शिक्षकांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यापीठाच्या नवीन इमारतीत विविध कार्यक्रम घेण्यात आले. विद्यापीठाचे विविध विभाग तीन स्वतंत्र इमारतींमध्ये असल्याने प्रत्येक ठिकाणी विद्यार्थिनींनी स्वतंत्रपणे कार्यक्रमाचे नियोजन केले. सजावट करण्यापासून ते स्पर्धांच्या आयोजनापर्यंतची जबाबदारी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सांभाळली.
कार्यक्रमादरम्यान बलून बॅलन्स, संगीत खुर्ची यांसारख्या मनोरंजक खेळांनी वातावरणात रंगत आणली. गुरुकुलम इमारतीतील स्पर्धांमध्ये सहायक प्राध्यापिका प्रियंका मुलचंदानी व प्रतीक्षा बेहरे यांनी विजेतेपद मिळविले. नृत्य स्पर्धेत सहायक प्राध्यापक हर्षित बल्की व अश्विनी वाणी यांनी बाजी मारली. यावेळी विद्यार्थिनींनी कविता, गाणी, नृत्य आणि मनोगताच्या माध्यमातून शिक्षकांविषयीच्या भावना व्यक्त केल्या. शिक्षकांनी दिलेले ज्ञान, मार्गदर्शन आणि संस्कार याबद्दल विद्यार्थिनींनी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कार्याला सलाम केला. त्यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि भावनिक वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी विजेता चव्हाण व शर्वरी आडेकर यांनी केले. यावेळी आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी शिक्षकांच्या सामाजिक योगदानाचे महत्त्व स्पष्ट केले. शिक्षक हे समाजनिर्मितीचा कणा असतात. विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालन करून शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा सकारात्मक उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले. कार्यक्रमाला आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले, उपकुलसचिव डॉ. बाळू राठोड, समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.




Petrol Price




