खुनाच्या गुन्ह्यातील जामिनावर सुटलेल्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या

- सिम्बायोसिस कॉलेजमागील जंगलात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; जुन्या वाहन धडक वादातून हत्या
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या २० वर्षीय तरुणाची दगडाने डोके ठेचून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. प्रतीक राजू कारंडेकर २० वर्षे रा. पारडी असे मृत तरुणाचे नाव आहे. सिम्बायोसिस कॉलेजच्या मागील जंगल परिसरात रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये एचबी टाऊन परिसरात एका व्यक्तीचा खून झाला होता. या प्रकरणात प्रतीक कारंडेकर याच्यासह त्याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. सुमारे दोन महिन्यांपूर्वी प्रतीक आणि त्याचे सहआरोपी जामिनावर कारागृहातून बाहेर आले होते.
गुरुवारी सायंकाळी प्रतीक हा मोटारसायकलवरून घराबाहेर पडला. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. शुक्रवारी सकाळी सिम्बायोसिस कॉलेजच्या मागील जंगल परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यावर दगडाने वार करून हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. संशयितांची दिवसभर चौकशी केल्यानंतर आवेश इक्बाल शेख १९ वर्षे रा. देशपांडे ले-आउट, गौसिया मशिदीजवळ, नागपूर याने मृतक प्रतीकसोबत वाहन धडकण्याच्या जुन्या वादातून साथीदाराच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी आवेश इक्बाल शेख आणि शाकीब शेख अब्दुल कलाम २६ वर्षे रा. आर. एस. किराणाजवळ, जयभीम चौक, नागपूर या दोघांना अटक केली आहे. हत्येमागील नेमके कारण, घटनेतील इतरांचा सहभाग आणि संपूर्ण घटनाक्रम याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
News - Nagpur




Petrol Price




