महत्वाच्या बातम्या

 विद्यार्थी प्रश्नांवर अपयशी ठरलेल्या मोदी सरकारला बरखास्त करा : शेतकरी कामगार पक्षाची राष्ट्रपतींकडे मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : विद्यार्थी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांवर केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत शेतकरी कामगार पक्षाने मोदी सरकार तातडीने बरखास्त करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली आहे. या मागणीचे निवेदन निवासी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले.

शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन हे निवेदन सादर केले. केंद्र सरकारच्या कारभारावर टीका करत विद्यार्थ्यांच्या समस्या आणि देशातील वाढत्या असंतोषाकडे लक्ष वेधण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सर्वच क्षेत्रात हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू केला आहे. सरकारमधील मंत्री सामान्य जनतेच्या हक्क आणि अधिकारांकडे दुर्लक्ष करत असून केवळ काही उद्योगपतींच्या हितासाठी काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

देशभरात महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर फुटण्याच्या घटना घडत असून त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारण्यास केंद्र सरकार तयार नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

परीक्षा घोटाळ्यांच्या विरोधात युवक संघटना आणि विद्यार्थ्यांकडून दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना सरकारकडून कोणतीही सकारात्मक चर्चा करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला.

शास्त्रज्ञ सोनम वांगचूक यांनी सुरू केलेले आमरण उपोषण कोणतीही चर्चा न करता बळजबरीने संपविण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आल्याचा आरोपही शेतकरी कामगार पक्षाने केला आहे. सोनम वांगचूक, अभिजीत दिपके तसेच इतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.

लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांचे पालन करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत पक्षाने सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. देशातील विद्यार्थी, युवक आणि सामान्य जनतेमध्ये सरकारविरोधात असलेला रोष लक्षात घेऊन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार तातडीने बरखास्त करून जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे.

यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य, शामसुंदर उराडे, जिल्हा समिती सदस्य डॉ. गुरुदास सेमस्कर, डंबाजी भोयर, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, चंद्रकांत भोयर, योगेश चापले, कविता मेश्राम, संगिता चांदेकर, पोर्णिमा कांबळे आणि सोनाली कवडो यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos