महत्वाच्या बातम्या

 विद्यार्थ्यांनी प्रत्येक दिवस शिक्षणासाठी घालवला पाहिजे : गटशिक्षणाधिकारी आखाडे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : विद्यार्थ्यांनी जीवनातील प्रत्येक दिवस शिक्षणासाठी समर्पित केला पाहिजे. नियमित अभ्यास, शिस्त, जिज्ञासा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातूनच उज्ज्वल भविष्य घडते, असे प्रतिपादन चामोर्शीचे गटशिक्षणाधिकारी आखाडे यांनी केले.

आखाडे यांनी भामरागड तालुक्यातील विविध शाळांना आकस्मिक भेटी देत शैक्षणिक कामकाजाची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून शाळांमधील उपलब्ध सोयी-सुविधा, शिक्षणाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या अडचणी तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी नियमितपणे शाळेत उपस्थित राहून प्रत्येक दिवस शिक्षणासाठी खर्च करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यानंतर त्यांनी गटसाधन केंद्र, भामरागड येथे सुरू असलेल्या टीओटी (Training of Trainers) प्रशिक्षण वर्गाला भेट दिली. यावेळी भामरागडचे गटशिक्षणाधिकारी निखिल कुंबरे यांनी पुष्पगुच्छ देऊन मा. आखाडे यांचे स्वागत केले.

प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन करताना मा. आखाडे यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असलेली क्षमता ओळखून त्याचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी शिक्षकांनी संवेदनशीलता, समर्पण आणि गुणवत्तापूर्ण अध्यापनाचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच नैतिक मूल्ये, संस्कार आणि जीवनकौशल्ये विकसित करण्यासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयालाही भेट देऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची, निवास व्यवस्था व उपलब्ध सुविधांची माहिती घेत विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाची प्रेरणा दिली. तसेच नियमित अभ्यास, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर जीवनात यश संपादन करता येते, असा संदेश त्यांनी दिला.

या प्रसंगी भामरागडचे गटशिक्षणाधिकारी निखिल कुंबरे, ताडगावचे केंद्रप्रमुख रामटेके, केंद्रप्रमुख कोहळे, धनीराम तुलावी, कालिदास कुणघाडकर, काकडे तसेच प्रशिक्षणार्थी शिक्षक उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos