महत्वाच्या बातम्या

 थरारक चोरी : एटीएममधील १२.२२ लाखांची रोकड लंपास, पुरावे नष्ट करण्यासाठी संपूर्ण मशीनच पेटवले


 -खरांगणा मोरांगणा येथील धक्कादायक घटना : सीसीटीव्हीवरही स्प्रे, चोरट्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : पुरावे नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी अवलंबलेली एक धक्कादायक शक्कल खरांगणा मोरांगणा येथे उघडकीस आली आहे. बसस्थानकाजवळील बँक ऑफ इंडियाच्या (BOI) एटीएम केंद्रावर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी करत तब्बल १२ लाख २२ हजार रुपयांची रोकड लंपास केली. एवढ्यावरच न थांबता, चोरीचा कोणताही सुगावा लागू नये आणि सीसीटीव्ही फुटेज नष्ट व्हावे, या हेतूने चोरट्यांनी संपूर्ण एटीएम मशीनला आग लावून ते खाक केले.

ही घटना १ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

शटर कटरने कापून आत प्रवेश -

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी आधी एटीएम केंद्राचे शटर कटरच्या साहाय्याने कापून आत प्रवेश केला. त्यानंतर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने एटीएम मशीन फोडून त्यामधील १२ लाख २२ हजार रुपयांची रोकड काढून घेतली. चोरीनंतर आपली ओळख लपवण्यासाठी आणि तपासात कोणताही पुरावा शिल्लक राहू नये, यासाठी ज्वलनशील पदार्थाचा वापर करून एटीएम मशीनला आग लावण्यात आली.

मशीन जळून खाक; केबिनचेही मोठे नुकसान -

चोरट्यांनी लावलेल्या आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, संपूर्ण एटीएम मशीन जळून कोळसा झाले. तसेच एटीएम केबिनचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्राथमिक तपासात चोरट्यांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून ही चोरी अत्यंत शिताफीने केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरही स्प्रे -

घटनास्थळाच्या पाहणीत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. एटीएम केंद्राबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरही चोरट्यांनी स्प्रे मारल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांची ओळख पटू नये, यासाठी त्यांनी आधीच नियोजन केल्याचे स्पष्ट होत आहे. आता परिसरातील इतर रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव -

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वंदना कारखेले, पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी दीपक साळुंखे, मनीष श्रीवास, सौरभ अंबाडरे, अमर करणे, उमेश गेडाम, अविनाश नवराते यांच्यासह फॉरेन्सिक पथक आणि डॉग स्कॉडनेही घटनास्थळी तपासणी केली.

अग्निशमन दलाने आगीवर मिळवले नियंत्रण -

घटनेची माहिती मिळताच वर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी अशोक लोखंडे, फायरमन मयूर सोनवणे आणि वाहनचालक प्रदीप तराळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत एटीएम मशीन आणि केबिनचे मोठे नुकसान झाले होते.

दरम्यान, या थरारक चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर तपास सुरू आहे.





  Print






News - Wardha




Related Photos