अंगणवाडी भरतीत गंभीर अनियमिततेचा संशय, जाहिरातीविना भरती- राज बन्सोड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महिला व बालविकास विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या १६४ पदांच्या भरती प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांना निवेदन सादर करून भरती प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.
राज बन्सोड यांनी सांगितले की, ३० जुलै २०२६ रोजी वृत्तपत्रातून भरतीची माहिती प्रसिद्ध करण्यात आली, तर अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै ठेवण्यात आली. अंतिम मुदतीच्या अवघ्या एका दिवसापूर्वी माहिती प्रसिद्ध करून उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करणे हे अन्यायकारक, अव्यवहार्य व संशयास्पद आहे. एका दिवसात रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रे गोळा करून अर्ज सादर करणे शक्यच नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय २९, ३० व ३१ जुलै दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अनेक भागात रस्ते बंद होते, वाहतूक विस्कळीत झाली होती आणि अनेक गावांमध्ये वर्तमानपत्रेही वेळेवर पोहोचली नाहीत. त्यामुळे मोठ्या संख्येने पात्र महिलांपर्यंत भरतीची माहितीच पोहोचू शकली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच भरतीमध्ये स्थानिक गावातील महिलांना प्राधान्य असताना कोणत्या गावात किती जागा रिक्त आहेत, याची अधिकृत माहिती उमेदवारांना देण्यात आली नाही. यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक नसल्याचे बन्सोड यांनी म्हटले आहे.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक बाणाईत उपस्थित नसल्याने आज शेख मॅडम यांच्याकडे विचारणा केली असता, ही प्रक्रिया तालुका प्रकल्प अधिकारी यांच्याकडून होत असून कुठल्या ग्रामपंचायत मध्ये पद भरती होत आहेत हे आम्हाला माहिती नसते असे सांगितले. यावर मग पद भरतीची approval कुणाकडून होते हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
राज बन्सोड यांनी असा सवाल उपस्थित केला की, भरतीची माहिती सर्वसामान्य उमेदवारांपासून लपवून ठेवून काही निवडक उमेदवारांना आधीच माहिती देण्यात आली होती का अंतिम मुदतीच्या एक दिवस आधीच प्रसिद्धी देणे म्हणजे भरती प्रक्रिया पूर्वनियोजित असल्याचा संशय निर्माण होत असून संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
आजाद समाज पार्टीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत -
1. अर्जासाठी किमान १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी.
2. गावनिहाय रिक्त पदांची अधिकृत यादी तात्काळ जाहीर करावी.
3. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक कारवाई करावी.
जर प्रशासनाने तात्काळ मुदतवाढ जाहीर करून भरती प्रक्रिया पारदर्शक केली नाही, तर आजाद समाज पार्टी जिल्हा परिषद कार्यालयासमोर तीव्र लोकशाही आंदोलन उभारेल. त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा राज बन्सोड यांच्यासह पक्षाचे प्रवक्ते प्रितेश अंबादे, युवा अध्यक्ष विवेक खोब्रागडे, सुरेंद्र वासनिक यांनी दिला आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




