कुलरच्या विजेचा धक्का लागून ३३ वर्षीय तरुणाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नवेझरी गावात कूलरच्या विजेचा धक्का लागून एका ३३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी १५ रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत तरुणाचे नाव शैलेश चंदन उके ३३ वर्षे, रा. नवेझरी असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश उके हे बुधवारी रात्री आपल्या घरातील काही काम करत होते. त्यावेळी ते अचानक कूलरच्या संपर्कात आले आणि त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. धक्का बसताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांना उपचारासाठी तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले.
मात्र, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर शैलेश उके यांना मृत घोषित केले. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे उके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नवेझरी गावात शोककळा पसरली आहे.
या घटनेची माहिती विष्णुदास शिवनाथ उके वय ४५, रा. नवेझरी यांनी तिरोडा पोलिसांना दिली. त्यांच्या माहितीवरून तिरोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, पावसाळ्यात घरगुती विद्युत उपकरणांचा वापर करताना आवश्यक सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत असून, विद्युत उपकरणांची नियमित तपासणी करण्याची गरज या घटनेनिमित्ताने अधोरेखित झाली आहे.
News - Gondia




Petrol Price




