महत्वाच्या बातम्या

 छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत भंडारा जिल्ह्यात तीन ठिकाणी शिबिरांचे आयोजन


नागरिकांनी शिबिरांचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी सावन कुमार यांचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने शासनाच्या निर्देशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान भंडारा जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी या शिबिरांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केले आहे.

शासनाच्या निर्णयानुसार २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक दिवस समाधान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये महसूल विभागासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सेवा तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम (सेवा हमी कायदा) अंतर्गत नागरिकांना आवश्यक असलेल्या विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

भंडारा जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे -

तुमसर विधानसभा मतदारसंघ (क्र. ६०)
ठिकाण : तहसील कार्यालय, तुमसर
दिनांक : २२ जुलै २०२६
साकोली विधानसभा मतदारसंघ (क्र. ६२)
ठिकाण : आशीर्वाद लॉन, साकोली
दिनांक : २६ जुलै २०२६
भंडारा विधानसभा मतदारसंघ (क्र. ६१)
ठिकाण : पोलीस बहुउद्देशीय हॉल, भंडारा
दिनांक : ३१ जुलै २०२६

या समाधान शिबिरांमध्ये महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा, आवश्यक दाखले व प्रमाणपत्रे, प्रलंबित अर्जांचा निपटारा, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती व लाभ तसेच नागरिकांच्या महसुली समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.नागरिकांना विविध शासकीय सेवा मिळविण्यासाठी वारंवार कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि त्यांच्या अडचणींचे जलद निराकरण व्हावे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाबाबत अधिक माहितीसाठी नागरिकांनी संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos