महत्वाच्या बातम्या

 विदर्भातील जुलै पावसाचे शतकभरातील विक्रम : गोंदिया अव्वल, चंद्रपूर दुसऱ्या स्थानी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : विदर्भातील जुलै महिन्यातील विक्रमी पावसाच्या नोंदींनी गेल्या शतकभरातील अनेक ऐतिहासिक विक्रमांची आठवण करून दिली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार, जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद गोंदिया येथे २०१३ मध्ये तब्बल ९३६.२ मिमी इतकी झाली असून, त्यानंतर चंद्रपूरने २०२३ मध्ये ९०५.४ मिमी पावसाची नोंद करत विदर्भात दुसरे स्थान पटकावले आहे.

पर्यावरण व हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी उपलब्ध ऐतिहासिक आकडेवारीचा अभ्यास करून ही माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यांच्या मते, विदर्भात जुलै महिन्यात अतिवृष्टीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, बदलत्या हवामानाचा त्यावर प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे.

आकडेवारीनुसार, वर्धा येथे २०२२ मध्ये ८७६.४ मिमी, यवतमाळ येथे २०२३ मध्ये ७००.४ मिमी, नागपूर येथे १९९४ मध्ये ६७८.९ मिमी, अकोला येथे १८८३ मध्ये ५४६.६ मिमी, बुलढाणा येथे १९१६ मध्ये ५३४.४ मिमी आणि अमरावती येथे १९४६ मध्ये ४७३.७ मिमी पावसाची नोंद झाली होती.

दरम्यान, २४ तासांतील विक्रमी पावसाच्या नोंदीही तितक्याच उल्लेखनीय आहेत. यवतमाळ येथे २२ जुलै २०२३ रोजी ३१६.१ मिमी पाऊस पडून विदर्भातील सर्वोच्च २४ तासांचा विक्रम नोंदविण्यात आला. त्यानंतर नागपूर येथे १२ जुलै १९९४ रोजी ३०४.० मिमी, वर्धा येथे १३ जुलै १९९४ रोजी २६६.४ मिमी, अकोला येथे १८ जुलै १९८६ रोजी २५५.० मिमी, चंद्रपूर येथे १९ जुलै २०२३ रोजी २४२.० मिमी, अमरावती येथे १३ जुलै १८८८ रोजी २३०.१ मिमी, गोंदिया येथे ७ जुलै १९९२ रोजी १९८.२ मिमी आणि बुलढाणा येथे ८ जुलै २०११ रोजी १६६.० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले की, विदर्भातील जुलै महिन्यातील पावसाचा इतिहास अत्यंत समृद्ध असून, गेल्या काही वर्षांत अतिवृष्टीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदाच्या २०२६ च्या जुलै महिन्यात पावसाचा जोर किती राहतो आणि शतकभरातील हे विक्रम कायम राहतात की नव्याने इतिहास रचला जातो, याकडे हवामान तज्ज्ञांसह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या ऐतिहासिक नोंदींवर आधारित ही आकडेवारी विदर्भातील मान्सूनच्या बदलत्या स्वरूपाचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जात असून, भविष्यातील हवामान नियोजनासाठीही ती उपयुक्त ठरणार आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos