महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूरला मिळणार राज्य राखीव पोलीस दलाचे बळ : विसापूर येथील ४५ एकर जागा देण्यास शासनाची मान्यता


- बंद पडलेल्या पॉवर हाऊसच्या जागेवर उभारला जाणार एसआरपीएफचा अत्याधुनिक तळ; आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील मौजा विसापूर येथे अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या पॉवर हाऊसच्या जागेवर राज्य राखीव पोलीस दलाचा (एसआरपीएफ) तळ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या परिसरातील ४५ एकर शासकीय जागा राज्य राखीव पोलीस दलासाठी उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून, यासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याने पूर्व विदर्भाच्या सुरक्षा व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे.

या संदर्भात मंत्रालयात गृह विभागाचे अपर मुख्य सचिव लोकेशचंद्र यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस दलाचे कमांडंट जगताप तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मौजा विसापूर येथील सुमारे ३१.३५ हेक्टर शासकीय जमीन अनेक वर्षांपासून वापरात नसून निर्जन अवस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आणून दिले. भौगोलिक स्थान, दळणवळणाची सुविधा आणि उपलब्ध पायाभूत सोयी लक्षात घेता ही जागा राज्य राखीव पोलीस दलाच्या तळासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तसेच चंद्रपूर, गडचिरोली आणि पूर्व विदर्भातील नक्षलविरोधी कारवायांना अधिक प्रभावीपणे चालना देण्यासाठी या जागेतील ४५ एकर क्षेत्र राज्य राखीव पोलीस दलासाठी देण्याची मागणी त्यांनी यापूर्वी शासनाकडे केली होती. या मागणीला बैठकीत शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत मान्यता दिली.

प्रस्तावित तळावर राज्य राखीव पोलीस दलासाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहेत. यामध्ये कवायत मैदान, शासकीय निवासस्थाने, अधिकारी विश्रामगृह, समादेशक कार्यालय, गटभंडार, शस्त्रागार, बॅचलर बॅरक, मेस, मोटार परिवहन विभाग, क्रीडांगण, दरबार हॉल, रुग्णालय, उपहारगृह, शाळा, नक्षलविरोधी अभियानासाठी विशेष डेमो मैदान, जिम्नॅशियम, नक्षल बंदोबस्तासाठी तीन कंपन्यांच्या मुक्कामाची व्यवस्था, मनोरंजन हॉल तसेच इतर आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार असल्याची माहिती आ. मुनगंटीवार यांनी दिली.

बैठकीत अपर मुख्य सचिव लोकेशचंद्र यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला शासनाने मान्यता दिल्याचे स्पष्ट केले. या प्रस्तावासंदर्भातील आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून जागा राज्य राखीव पोलीस दलाकडे हस्तांतरित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

या निर्णयाबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अपर मुख्य सचिव लोकेशचंद्र यांचे आभार मानले. विसापूर येथे राज्य राखीव पोलीस दलाचा तळ उभारला गेल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण पूर्व विदर्भातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होईल. त्याचबरोबर नक्षलविरोधी मोहिमांना गती मिळेल, सुरक्षा यंत्रणांची प्रतिसादक्षमता वाढेल, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील तसेच परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अनेक वर्षांपासून निष्क्रिय पडून असलेल्या शासकीय जागेचा आता सार्वजनिक हितासाठी उपयोग होणार असल्याने हा निर्णय पूर्व विदर्भाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे. सुरक्षा व्यवस्थेच्या बळकटीबरोबरच विकास आणि रोजगारनिर्मितीलाही या प्रकल्पामुळे नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





  Print






News - Rajy




Related Photos