महत्वाच्या बातम्या

 कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांची सोलापूर शहरात बदली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांची सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ च्या निर्णयानुसार ही बदली करण्यात आली.

आसिफ राजा शेख यांनी चंद्रपूर जिल्ह्यात येण्यापूर्वी नागपूर विभागात विविध ठिकाणी उल्लेखनीय सेवा बजावली होती. त्यांची नागपूर जिल्ह्यातून  चंद्रपूर जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस, बल्लारशाह, रामनगर आणि अलीकडे राजुरा पोलीस ठाण्यात त्यांनी ठाणेदार म्हणून काम करत आपल्या कार्यक्षमतेची छाप उमटवली.

गुन्ह्यांचा तपास वेगाने पूर्ण करणे, प्रलंबित प्रकरणांचा छडा लावणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आणि संघभावनेतून काम करून घेणे ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये मानली जातात. कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांशी सुसंवाद ठेवून त्यांच्याकडून प्रभावीपणे काम करून घेण्याची त्यांची हातोटी विशेष उल्लेखनीय राहिली आहे.

पोलीस दलात शिस्त आणि मानवी संवेदनशीलता यांचा समतोल राखणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांनी कार्यरत असलेल्या प्रत्येक ठिकाणी नागरिकांसह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये विश्वासार्हता मिळवली.

दरम्यान, राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांच्या आदेशात वाहतूक विभागातील पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात, तर पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांची गुन्हे अन्वेषण विभागात बदली करण्यात आली आहे.

सोलापूर शहरातील नव्या जबाबदारीतही आसिफराजा शेख आपल्या कार्यक्षम आणि परिणामकारक कामगिरीचा ठसा उमटवतील, अशी अपेक्षा पोलीस वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos