लोकशाहीच्या रक्षणासाठी संविधानाचे जतन आवश्यक : डॉ. देवसुधन धारगावे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी भारतीय संविधानाचे जतन व त्यातील मूल्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने मी भारतीय आहे ही भावना केवळ शब्दांत न ठेवता आपल्या आचरणातून व्यक्त करावी, असे प्रतिपादन डॉ. देवसुधन धारगावे यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहायक आयुक्त समाजकल्याण, जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय भवन येथे भारतीय संविधान दिवस आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त आशा कवाडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रशांत दखणे, प्रा. ज्ञानचंद जांभूळकर, प्रा. शिलवंतकुमार मडामे, प्रा. आंबिलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. उपस्थितांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. धारगावे म्हणाले की, भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून देशातील विविध जाती, धर्म आणि पंथांना एकत्र बांधून ठेवणारा लोकशाहीचा भक्कम आधार आहे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूलभूत मूल्ये दिली आहेत. ही मूल्ये केवळ भाषणांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष जीवनात रुजविणे गरजेचे आहे. संविधानाचे रक्षण करणे म्हणजेच लोकशाहीचे रक्षण करणे असून, संविधानिक मूल्यांचे जतन व संवर्धन ही प्रत्येक भारतीयाची सामूहिक जबाबदारी आहे.
प्रा. शिलवंतकुमार मडामे यांनीही संविधानाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. भारतीय संविधान हे लोकशाहीचा आत्मा असून देशाच्या उज्ज्वल भविष्याचा भक्कम आधार आहे. संविधानाने जात, धर्म, पंथ असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार दिला आहे. हर घर संविधान ही संकल्पना प्रत्यक्षात रुजविण्याची गरज असून संविधानाची माहिती प्रत्येक घरापर्यंत आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनापर्यंत पोहोचली पाहिजे. अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे बळ संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिले आहे. समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये लोकशाही अधिक बळकट करतात, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संविधान गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त आशा कवाडे यांनी केले, तर रामटेके यांनी आभार मानले. यावेळी अधिकारी, समाजप्रबोधनकार, मान्यवर, विद्यार्थी तसेच एमपीएससी परीक्षेची तयारी करणारे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Petrol Price




