महत्वाच्या बातम्या

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत एक वेळ समझोता योजनेची पहिली यादी जाहीर


- जिल्ह्यातील ३ हजार ७६६ लाभार्थ्यांचा समावेश ३१ मार्चपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राज्य शासनाची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत एक वेळ समझोता (ओटीएस) योजनेची मानक कार्यप्रणाली (एसओपी) प्रसिद्ध करण्यात आली असून, पात्र कर्जदार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून पहिल्या यादीत जिल्ह्यातील ३ हजार ७६६ लाभार्थ्यांचा समावेश असून उर्वरित लाभार्थ्यांची यादी पुढील टप्प्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. 

सहकार आयुक्त तथा सहकारी संस्थांच्या निबंधक कार्यालयाने १९ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या निर्देशानुसार, पात्र शेतकऱ्यांची ही यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीत कर्जाची थकबाकी, कपातीनंतरची रक्कम, शेतकऱ्याने भरावयाचा हिस्सा आणि शासनाकडून मिळणारा लाभ यांचा सविस्तर तपशील नमूद असेल.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये व कार्यपद्धती -
दोन लाख रुपयांपेक्षा अधिक पात्र कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. त्यावरील उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना स्वतःचा हिस्सा म्हणून भरावी लागेल. (उदाहरणार्थ: एखाद्या शेतकऱ्याचे पात्र कर्ज २.६० लाख रुपये असल्यास, त्याला ६० हजार रुपये स्वतःचा हिस्सा भरावा लागेल आणि उर्वरित २ लाख रुपयांचा लाभ शासनाकडून मिळेल). 

शेतकऱ्याचे एकच कर्ज खाते असल्यास त्याच खात्यात रक्कम जमा करावी. एकापेक्षा अधिक कर्जखाती असल्यास कोणत्याही एका खात्यात रक्कम जमा करता येईल. मात्र, कपातीनंतरच्या थकबाकीपेक्षा अधिक रक्कम जमा करता येणार नाही. अद्ययावतीकरण व आधार प्रमाणीकरण  शेतकऱ्यांनी स्वतःचा हिस्सा भरल्यानंतर बँकांकडून दर शुक्रवारी महाआयटी पोर्टलवर या रकमेची नोंद अद्ययावत केली जाईल. त्यानंतर तीन दिवसांनी शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. 

अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य -
योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अ‍ॅग्रीस्टॅक (AgriStack) नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर शासनाचा मंजूर लाभ थेट शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा केला जाईल. सदर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत दिली आहे. तरी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी संबंधित बँक किंवा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन यादीत आपले नाव तपासावे आणि विहित मुदतीत स्वतःचा हिस्सा भरून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक पंकज वानखेडे यांनी केले आहे.





  Print






Related Photos