फेक इन्स्टाग्राम अकाउंटवरून महिलेची बदनामी : मुल पोलिसांत गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून तिचे व नातेवाईकाचे फोटो अपलोड करत बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याचा गंभीर प्रकार मुल येथे समोर आला आहे. याच अकाउंटवरून महिलेच्या भावालाही अश्लील भाषेत संदेश पाठवून शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी मुल पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिला मुल शहरात राहत असून, ती मागील काही वर्षांपासून पतीपासून वेगळी राहत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
११ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २ वाजता महिला मोबाईलवर इन्स्टाग्राम पाहत असताना तिच्या नावाने नावाचे बनावट अकाउंट तयार केल्याचे निदर्शनास आले. या अकाउंटवर महिलेचे तसेच तिच्या नातेवाईकाचे फोटो अपलोड करून त्यावर My Love Life असा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता.
याशिवाय १० सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८.२४ वाजता याच बनावट अकाउंटवरून महिलेच्या भावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अश्लील आणि शिवीगाळ करणारा संदेश पाठविण्यात आला. या प्रकारामुळे महिलेची बदनामी करण्यासोबतच कुटुंबीयांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी मुल पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 66(C) व 67 तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस), 2023 मधील कलम 356(2) व 356(3) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय राठोड करीत आहेत.




Petrol Price




