गोंडवाना सैनिकी विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा!


- प्रत्येक वर्गाला संविधानाच्या उद्देशिकेची भेट; २६/११ च्या शहीद वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : भारतीय संविधानाच्या गौरवशाली परंपरेची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासोबतच लोकशाही मूल्यांचा जागर करण्याच्या उद्देशाने गोंडवाना सैनिकी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचिरोली येथे २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयाच्या वतीने प्रत्येक वर्गाला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची फ्रेम भेट देण्यात आली. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक गजानन ढोले व संगीत शिक्षक सुनील लोखंडे हे होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान उद्देशिका यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. प्रसंगी प्राचार्य संग्रामे यांनी भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. संविधान हे केवळ देशाच्या शासनव्यवस्थेचा आधार नसून प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि कर्तव्याची जाणीव करून देणारा मूलभूत दस्तऐवज असल्याचे यावेळी बोलले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यालयाच्या वतीने प्रत्येक वर्गाला संविधानाच्या उद्देशिकेची फ्रेम भेटस्वरूपात प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्ये केवळ पुस्तकापुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या आचरणात आणावीत आणि लोकशाहीप्रती सजग नागरिक म्हणून घडावे, हा या उपक्रमामागील उद्देश होता. प्रत्येक वर्गात संविधानाच्या उद्देशिकेच्या माध्यमातून संविधानिक मूल्यांची जाणीव कायम राहणार आहे.
२६ नोव्हेंबर हा संविधान दिन असण्यासोबतच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर जवानांच्या आणि निष्पाप नागरिकांच्या स्मरणाचाही दिवस आहे. यानिमित्ताने दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, सुरक्षा जवान आणि वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या अतुलनीय शौर्य, त्याग आणि देशनिष्ठेचे स्मरण करून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक गजानन ढोले, संगीत शिक्षक सुनील लोखंडेहे होते त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व, नागरिकांची कर्तव्ये आणि लोकशाही मूल्यांचे जतन करण्याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन शाहिद शेख यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन सुरेश रेचनकर यांनी केले.संविधानाचा सन्मान, शहीद वीरांच्या बलिदानाचे स्मरण आणि राष्ट्राप्रती कर्तव्याची जाणीव या त्रिसूत्रीचा संदेश देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.




Petrol Price




