निराधार व गरजू नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून द्या : आमदार राजेश बकाने


- संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक; २०४ प्रकरणे निकाली
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : देवळी तालुक्यातील गरीब, गरजू व निराधार नागरिकांना शासनाच्या सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. पात्र लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत, यासाठी संबंधित यंत्रणेने विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश आमदार राजेश बकाने यांनी दिले.
देवळी येथील संजय गांधी निराधार योजना समितीची मासिक बैठक आमदार राजेश बकाने यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आदी योजनांच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यावेळी समितीसमोर ठेवण्यात आलेली एकूण २०४ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
बैठकीला समितीचे अध्यक्ष आमदार राजेश बकाने यांच्यासह सदस्य प्रमिला भैयाजी चोरे, राहुल सुरेशराव गायकवाड, संतोष महादेवराव पोहणे, मनोज वामनराव वाल्दे, शिल्पा दिपकसिंग चव्हाण, विशाल गजाननराव मुडे, संतोष नामदेवराव भोयर आदी उपस्थित होते. तसेच तहसीलदार समर्थ क्षिरसागर, सदस्य सचिव तथा नायब तहसीलदार हेमा जाधवर आणि नगर परिषद पुलगावचे शासकीय प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आमदार बकाने यांनी तालुक्यातील गरजू व निराधार नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी योजनांची व्यापक जनजागृती आणि प्रसिद्धी करण्याच्या सूचना दिल्या. पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे वेळेत निकाली काढून त्यांना शासनाच्या अर्थसहाय्याचा लाभ मिळवून देण्यावर भर देण्याचेही त्यांनी सांगितले.




Petrol Price




