अवैध रेती वाहतुकीला लगाम : कुरुडच्या घाटमार्गावर खोदले मोठे खड्डे


- महसूल विभागाची कारवाई; वाहनांची ये-जा रोखण्याचा प्रयत्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वडसा : देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथील वैनगंगा नदीपात्रातून होणारी अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. रेती घाटाकडे जाणाऱ्या मार्गावर महसूल विभागाने २० नोव्हेंबर रोजी सकाळी मोठे व खोल खड्डे खोदून वाहनांची ये-जा बंद करण्याचा प्रयत्न केला. या कारवाईमुळे अवैध रेती वाहतुकीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. देसाईगंज तालुक्यातील वैनगंगा नदीपात्रातील विविध घाटांवरून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. कुरुड येथील रेती घाट परिसरात रात्रीच्या सुमारास रेतीचे उत्खनन करून वाहनांद्वारे वाहतूक केली जात असल्याची चर्चा होती. नदीपात्रातून रेती काढण्यासाठी तसेच वाहनांची ये-जा सुलभ व्हावी, यासाठी घाटापर्यंत जाणारे मार्ग तयार करण्यात आल्याचेही सांगितले जात होते.
या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने अवैध रेती वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या मार्गावर खड्डे खोदून तो बंद करण्याची कारवाई केली. नदीपात्रालगत मातीचे उत्खनन करून मोठे खड्डे तयार करण्यात आले आहेत. घटनास्थळावरील छायाचित्रांमध्येही खोल खड्डे आणि वाहनांच्या हालचालींच्या खुणा दिसून येत आहेत. प्रशासनाच्या या कारवाईमुळे रेती वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या मार्गावर अडथळा निर्माण झाला आहे.
केवळ खड्डे खोदून प्रश्न सुटणार का? -
महसूल विभागाने केलेल्या या कारवाईचे स्वागत होत असले, तरी अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळविण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजनांची गरज आहे. केवळ घाटाकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डे खोदून कारवाई मर्यादित न ठेवता नदीघाट परिसरात नियमित गस्त घालणे, रात्रीच्या वेळी तपासणी करणे आणि अवैध उत्खननात सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. अनेकदा प्रशासनाच्या कारवाईनंतर काही काळ अवैध वाहतूक थांबते; मात्र त्यानंतर पुन्हा ती सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कुरुड रेती घाटावर महसूल विभागाने सातत्याने लक्ष ठेवण्याची गरज आहे. महसूल प्रशासनाच्या या कारवाईनंतर वैनगंगा नदीपात्रातील अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीला कायमस्वरूपी आळा बसणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.




Petrol Price




