पुलखल फाट्याजवळ इनोव्हाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : चंद्रपूर मार्गावरील पुलखल फाट्याजवळ भरधाव टोयोटा इनोव्हा वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी २२ रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. अपघातानंतर इनोव्हा चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सुरेश डोकाजी भांडेकर ६० वर्ष आणि दिवाकर बाबुराव म्हशाखेत्री ५५ वर्ष, दोघेही रा. वाघोली बुट्टी, ता. सावली, जि. चंद्रपूर) अशी मृत पावलेल्यांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश भांडेकर आणि दिवाकर म्हशाखेत्री हे दोघे स्प्लेंडर दुचाकीने (एमएच ३४ सीएच ७९११) प्रवास करीत होते. ते गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील पुलखल फाट्याजवळील सारडा राईस मिलसमोर आले असता, मागून भरधाव वेगात येणाऱ्या टोयोटा इनोव्हा वाहनाने (एमएच ४९ बीझेड ५३४०) त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह पुढील कायदेशीर कार्यवाही व शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात फरार इनोव्हा चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २८१, १०६(१) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४, १८४ व १८७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार चालकाचा शोध घेण्यात येत असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस करीत आहेत.




Petrol Price




