महत्वाच्या बातम्या

 वांगेतुरीमध्ये १७० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी : पोलीस व विविध संस्थांचा संयुक्त उपक्रम


- २० नागरिकांना पुढील उपचारांची शिफारस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा सहजपणे पोहोचावी, या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज पोस्टे वांगेतुरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. गडचिरोली पोलीस दल, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, जिल्हा परिषद गडचिरोली, केंद्रीय राखीव पोलीस बल (सीआरपीएफ) आणि शालिनी मेघे रुग्णालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या शिबिरात तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने सुमारे १७० नागरिकांची तपासणी करून त्यांना आवश्यकतेनुसार मोफत औषधे उपलब्ध करून दिली. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात शालिनी मेघे रुग्णालय, नागपूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप जोशी (जनरल फिजिशियन), डॉ. सारंग डोंगरे (नेत्ररोग तज्ज्ञ), डॉ. प्रांजल नागोसे (नेत्ररोग तज्ज्ञ) आणि नर्सिंग स्टाफने सेवा दिली. या दरम्यान नागरिकांना विविध आजार व पोषण समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले, तर २० नागरिकांना पुढील तपासणीसाठी विविध रुग्णालयांमध्ये पाठवण्याची शिफारस करण्यात आली.

गडचिरोली पोलीस दलाकडून सन २०२१ पासून आजपर्यंत २२६ आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून जवळपास ५० हजारहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच ६ रक्तदान शिबिरांतून ४,८६४ युनिट रक्त संकलन करण्यात आले असून, ऑपरेशन रोशनी अंतर्गत ९,९७१ पेक्षा अधिक नागरिकांची नेत्रतपासणी करून १,४१२ नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे. या आरोग्य शिबिरासोबतच फिरत्या प्रदर्शनी व विविध बॅनरच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असताना शहीद झालेल्या जवानांचे बलिदान, सी-६० जवानांचे शौर्य आणि पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांची माहिती देऊन उपस्थित नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. 

सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.) सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) हर्षवर्धन बी.जे., सहा. पोलीस अधीक्षक (भामरागड) तथा उपविभागीय पोलीस अधिकारी (हेडरी) सागर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे वांगेतुरीचे पोनि. विश्वास पुल्लरवार, सीआरपीएफ १९१ बटालियनचे असिस्टंट कमांडंट मनोज कुमार, सीआरपीएफ १९१ बटालियनचे पोनि. जितेंद्र कुमार आणि वांगेतुरी पोलीस ठाण्यातील अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले.





  Print






Related Photos