प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्यांना पुन्हा संधी : ३० नोव्हेंबरपर्यंत करता येणार नावाची नोंदणी


- अनुपस्थित, स्थलांतरित, मृत अथवा दुबार नोंद झालेल्या मतदारांना दिलासा; २२ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान विविध कारणांमुळे ज्या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होऊ शकली नाहीत, अशा मतदारांना आता पुन्हा एकदा मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनुपस्थित, स्थलांतरित, मृत अथवा दुबार मतदार म्हणून नोंद झालेल्या तसेच गणना फॉर्म परत प्राप्त न झाल्यामुळे प्रारूप मतदार यादीतून वगळल्या गेलेल्या मतदारांना ३० नोव्हेंबरपर्यंत आपले नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान मतदारांना गणना फॉर्म वितरित करण्यात आले होते. मात्र, काही कारणांमुळे अनेक मतदारांकडून हे फॉर्म निर्धारित वेळेत परत प्राप्त झाले नाहीत. तसेच काही मतदारांची नावे अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार म्हणून नोंदविण्यात आली. परिणामी अशा मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होऊ शकली नाहीत. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदारांना पुन्हा संधी देण्यासाठी निवडणूक आयोगाने सुधारित वेळापत्रक निश्चित केले आहे. या वेळापत्रकानुसार ३० नोव्हेंबरपर्यंत अर्जांचे वितरण आणि संकलन करण्यात येणार आहे. प्राप्त अर्जांचा निपटारा १० डिसेंबरपर्यंत पूर्ण केला जाईल. त्यानंतर १५ डिसेंबरपर्यंत नोटीस प्रक्रिया राबवून दावे आणि हरकती मागविण्यात येणार आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २२ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
प्रारूप यादीत नाव नसलेल्यांनी काय करावे? -
यापूर्वी अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार म्हणून नोंद झालेल्या मतदारांची प्रारूप यादी सर्व मतदान केंद्रांवर, ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती आणि नगरपंचायत कार्यालयांच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच ही यादी एनआयसीच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित मतदारांनी प्रारूप यादीत आपले नाव तपासावे. यादीत नाव नसल्यास आपल्या EPIC अर्थात मतदार ओळखपत्र क्रमांकाचा वापर करून निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर किंवा अधिकृत ॲपवरून गणना फॉर्म डाउनलोड करावा. त्यानंतर आवश्यक माहिती भरून संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करावा.
निवासस्थान न बदललेल्या मतदारांसाठी विशेष तरतूद -
ज्या मतदारांनी आपले निवासस्थान बदललेले नाही; मात्र काही कारणास्तव यापूर्वी गणना फॉर्म सादर करू शकले नाहीत, अशा मतदारांनाही पुन्हा संधी देण्यात आली आहे. अशा मतदारांनी भरलेला व स्वाक्षरी केलेला गणना फॉर्म आणि त्यासोबत Annexure-B मधील विवरणपत्र सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी गणना फॉर्म सादर न करण्याचे कारण या विवरणपत्रात नमूद करावे लागणार आहे. सदर फॉर्म संबंधित निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO), सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (AERO) किंवा बूथस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे स्वतः अथवा कुटुंबातील सदस्यामार्फत प्रत्यक्ष जमा करता येईल. याशिवाय ई-साइन सुविधेच्या माध्यमातून ऑनलाइन गणना फॉर्म सादर करण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्यातील दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेल्यांनाही संधी -
विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान नोंद असलेला मतदार त्याच राज्याच्या अंतर्गत दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाला असल्यास त्याला Form-8 सादर करण्याची आवश्यकता नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. अशा मतदारांनी नवीन पत्ता आणि संबंधित विधानसभा मतदारसंघाची माहिती नमूद करून गणना फॉर्मसोबत Annexure-C मधील विवरणपत्र सादर करावे. हा फॉर्म व विवरणपत्र अर्जदाराने किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याने स्वाक्षरी करून पत्त्याच्या पुराव्यासह स्थलांतरित झालेल्या विधानसभा मतदारसंघातील संबंधित ERO किंवा AERO यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित मतदान केंद्राच्या BLO शी संपर्क साधता येईल. BLO शी संपर्क साधण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा ECINET ॲपवर उपलब्ध असलेल्या Book a Call with BLO या सुविधेचा वापर करता येणार आहे. विशेष म्हणजे, कोणताही निवासस्थानाचा दस्तऐवज उपलब्ध नसलेल्या बेघर व्यक्तींच्या बाबतीत BLO यांचा क्षेत्रीय पडताळणी अहवाल निवासाच्या पुराव्याची अट पूर्ण करण्यासाठी पुरेसा मानण्यात येणार आहे.
अर्जांची पडताळणी करूनच अंतिम यादीत समावेश -
मतदारांकडून प्राप्त झालेल्या गणना फॉर्म आणि संबंधित विवरणपत्रांची छाननी व पडताळणी संबंधित ERO यांच्याकडून मतदार नोंदणी नियम, १९६० मधील नियम २१(१) नुसार करण्यात येणार आहे. यामध्ये अर्जदाराची पात्रता, सामान्य निवासस्थान आणि इतर आवश्यक तपशीलांची तपासणी केली जाईल. आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणीही करण्यात येणार आहे. पडताळणीनंतर ERO यांनी स्वीकारलेले गणना फॉर्म चालू विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी स्वतंत्रपणे ठेवण्यात येणार आहेत. अशा प्रकरणांमध्ये संबंधित मतदारांना विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेपूर्वी असलेलाच EPIC क्रमांक पुन्हा देण्यात येणार आहे.
Form-6 भरलेल्यांना पुन्हा गणना फॉर्मची गरज नाही -
विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान नव्याने मतदार नोंदणी करण्यासाठी ज्या नागरिकांनी यापूर्वीच Form-6 सादर केला आहे, अशा मतदारांना पुन्हा गणना फॉर्म आणि संबंधित विवरणपत्र सादर करण्याची आवश्यकता नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
३० नोव्हेंबरची मुदत लक्षात घेण्याचे आवाहन -
मतदार यादी अद्ययावत, अचूक आणि दोषरहित राहावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाने सुधारित वेळापत्रक निश्चित केले आहे. प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आवश्यक गणना फॉर्म व संबंधित कागदपत्रे विहित मुदतीत सादर करावीत. कोणताही पात्र मतदार मतदार यादीतून वंचित राहू नये, यासाठी नागरिकांनी आपले नाव तपासून आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी केले आहे. त्यामुळे प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता ३० नोव्हेंबरपूर्वी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.




Petrol Price




