महत्वाच्या बातम्या

 महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत लाभार्थी सर्वेक्षण व योजनांच्या परिणाम मूल्यांकन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई या महामंडळाची स्थापना १० जुलै १९७८ रोजी झाली असून, मागासवर्गीय समाजातील घटकांचे समाजिक व आर्थिक उत्थान करणे, त्यांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे तसेच त्यांचे जीवनमान उंचावणे हे महामंडळाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टांचा पूर्ततेसाठी महामंडळामार्फत विविध कर्ज व आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येतात.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्यामार्फत महामंडळाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण, योजनांचे परिणाम मूल्यांकन (Impact Assesment) करण्याचा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सदर उपक्रमांतर्गत महामंडळाच्या महाराष्ट्रातील आपल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा सर्व जिल्ह्यांमध्ये पायलट प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या १३ मार्च २०२६ रोजीच्या Non-IT शासन निर्णयानुसार M/s Primove Infrastructure Development Consultants Pvt. Ltd. या संस्थेची तांत्रिक सहाय्य संस्था (Technical Support Agency) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या सर्वेक्षणाच्या मुख्य उद्देश महामंडळाच्या विविध योजनांअंतर्गत कर्जाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची सद्यास्थिती जाणून घेणे, कर्जाचा वापर कोणत्या व्यवसायासाठी करण्यात आला आहे, लाभार्थ्यांच्या व्यवसायाची सद्यास्थिती, रोजगार व उत्पन्नामध्ये झालेली वाढ, योजनांचा लाभाध्यर्थ्यांच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर झालेला परिणाम तसेच कर्ज परतफेडीची सद्यास्थिती याबाबत माहिती संकलित करणे हा आहे.

सदर सर्वेक्षणामध्ये महामंडळाच्या विविध कर्ज योजनांच्या लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून आवश्यक माहिती संकलित करण्यात येणार आहे. तसेच, कर्ज वितरणानंतर लाभार्थ्यांना व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी, व्यवसायाची प्रगती व योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी यांचा अभ्यास करण्यात येणार आहे.

सदर सर्वेक्षणातून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे महामंडळाच्या योजनांची परिणामकारकता वाढविणे, भविष्यातील योजनांचे नियोजन अधिक प्रभावी करणे तसेच लाभार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.

तरी महामंडळाच्या सर्व संबंधित जिल्ह्यांतील कर्ज योजनांच्या लाभार्थ्यांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या नियुक्त प्रतिनिधींना आवश्यक ती माहिती व सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक, सिध्दार्थ खोब्रागडे यांच्यामार्फत करण्यात येत आहे.





  Print






Related Photos