चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम : ८० गुन्हेगारांची हद्दपारी, सात जण स्थानबद्ध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी सराईत, कुख्यात आणि संघटित गुन्हेगारीत सक्रिय असलेल्या गुन्हेगारांविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत ८० गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असून, महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती (एमपीडीए) कायद्यांतर्गत सात जणांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.
जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी अभिलेखावरील गुन्हेगारांची माहिती संकलित करून त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचा वेग वाढविला आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असूनही वारंवार गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे.
संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत सात टोळ्यांविरुद्ध कारवाईचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. यामध्ये गोवंश तस्करी करणाऱ्या दोन, मादक पदार्थांची विक्री करणारी एक, मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारी एक आणि शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या तीन टोळ्यांचा समावेश आहे. या कारवाईच्या अनुषंगाने एकूण ५४ गुन्हेगारांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ५५ अंतर्गत चार प्रस्ताव सादर करून ११ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तसेच विविध तरतुदींनुसार जिल्ह्यातून एकूण ८० गुन्हेगारांची हद्दपारी करण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १२६ व १२९ अंतर्गतही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, ३ हजार ८९४ प्रकरणांमध्ये संबंधितांकडून बंधपत्र घेण्यात आले आहे. या प्रक्रियेत ३ लाख २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, चार जणांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील हॉटेल, लॉज आणि धाब्यांची श्वान पथकाच्या मदतीने तपासणी केली जात आहे. या मोहिमेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांचा वचक निर्माण करण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना बळकट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अशा प्रतिबंधात्मक कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.




Petrol Price




