१३ दिवसांच्या आंदोलनाला यश : ३२ आशा स्वयंसेविकांच्या थकीत मानधनाचा मार्ग मोकळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : कोरोना काळातील प्रलंबित १२ महिन्यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या मागणीसाठी घुग्घुस येथील ३२ आशा स्वयंसेविकांनी सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला अखेर १३ व्या दिवशी यश आले आहे. येत्या तीन दिवसांत नगर परिषदेची विशेष सभा घेऊन थकीत प्रोत्साहन रक्कम आशा स्वयंसेविकांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहे. गेल्या १३ दिवसांपासून ३२ आशा स्वयंसेविका कडाक्याच्या थंडीत रात्रंदिवस आपल्या हक्काच्या पैशांसाठी आंदोलन करीत होत्या. या आंदोलनादरम्यान चार आशा स्वयंसेविकांची प्रकृती खालावली होती. काही महिलांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करावे लागले. शारीरिक त्रास आणि कौटुंबिक अडचणींचा सामना करूनही या महिलांनी आपला संघर्ष सुरूच ठेवला.
अखेर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने आंदोलनावर तोडगा काढण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. येत्या तीन दिवसांत नगर परिषदेची विशेष सभा घेऊन कोरोना काळातील उर्वरित १२ महिन्यांच्या थकीत प्रोत्साहन भत्त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असून, ही रक्कम आशा स्वयंसेविकांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय विरोधी पक्षनेते आणि बांधकाम सभापती यांनी संयुक्तपणे ३ लाख ८४ हजार रुपयांचा धनादेश दिला आहे. मात्र, केवळ आश्वासन किंवा धनादेश देऊन प्रश्न सुटणार नसून संपूर्ण थकीत रक्कम प्रत्यक्ष बँक खात्यात जमा होणे आवश्यक असल्याची भूमिका आशा स्वयंसेविकांनी घेतली आहे. दिलेल्या आश्वासनानुसार तीन दिवसांत विशेष सभा घेऊन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा उपोषण आंदोलन सुरू करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या आंदोलनाला आजाद समाज पार्टीचे विदर्भ सचिव सुरेश पाईकराव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महासचिव रिताताई देशकर यांनी नेतृत्व देत सुरुवातीपासून पाठिंबा दिला. ३२ आशा स्वयंसेविकांनी दाखवलेली एकजूट, जिद्द आणि संघर्षाच्या बळावरच आंदोलनाला हे यश मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. आशा स्वयंसेविकांच्या मेहनतीचा आणि हक्काचा मोबदला मिळविण्यासाठी उभारलेल्या या लढ्यामुळे घुग्घुसमध्ये त्यांच्या एकजुटीची चर्चा होत आहे. आता प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची वेळेत पूर्तता करून सर्व ३२ आशा स्वयंसेविकांच्या खात्यात संपूर्ण थकीत रक्कम जमा करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.




Petrol Price




