महत्वाच्या बातम्या

 प्रतिबंधित सु्गंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणा­ऱ्या आरोपींना गडचिरोली पोलीसांनी केली अटक


- देसाईगंज पोलिसांची कारवाई; ७ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : महाराष्ट्र शासनाने विक्री व वाहतुकीवर प्रतिबंध घातलेल्या सुगंधित तंबाखूची चारचाकी वाहनातून अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना देसाईगंज पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुगंधित तंबाखूसह चारचाकी वाहन असा एकूण ७ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ५ ऑक्टोबर २०२६ रोजी अर्जुनी-मोरगाव ते देसाईगंज मार्गावर करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मनोहरलाल गुरुदासमन दासवानी (५९, रा. श्रीनगर वॉर्ड, गोंदिया) आणि प्रमोद श्रावण पटले (३९, रा. टेंबरी, ता. जि. गोंदिया) अशी आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखूच्या विक्री व वाहतुकीवर कायदेशीर प्रतिबंध घातला आहे. जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, अवैध दारू, जुगार तसेच अन्य अवैध व्यवसायांविरोधात प्रभावी कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे, उपपोलिस ठाणे आणि पोलिस मदत केंद्रांना दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर देसाईगंज पोलिसांना ५ ऑक्टोबर रोजी गोपनीय माहिती मिळाली होती. अर्जुनी-मोरगाव मार्गे देसाईगंजच्या दिशेने एमएच-४६-झेड-११४१ क्रमांकाच्या ग्रे रंगाच्या शेव्हरोलेट एन्जॉय या चारचाकी वाहनातून दोन व्यक्ती प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीच्या आधारे देसाईगंज पोलिसांच्या पथकाने अर्जुनी ते देसाईगंज मार्गावर सापळा रचून पाळत ठेवली. यावेळी संशयास्पदरीत्या एक ग्रे रंगाची चारचाकी येताना दिसली. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून ते थांबविले. वाहनातील चालक आणि त्याच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे मनोहरलाल दासवानी आणि प्रमोद पटले असल्याचे सांगितले.

पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये विविध प्रकारचा सुगंधित तंबाखू आढळून आला. त्यात होल्या हुक्का शिशा तंबाखूचे १ किलो वजनाचे ११० पाकीट, अंदाजे १ लाख ६५ हजार रुपये, तसेच ईगल हुक्का शिशा तंबाखूचे प्रत्येकी ४०० ग्रॅम वजनाचे ७० पाकीट, अंदाजे ७० हजार रुपये, असा माल आढळून आला.

याशिवाय मजा १०८ हुक्का शिशा तंबाखूचे ५० ग्रॅम वजनाचे १० टिनाचे डबे, अंदाजे ६० हजार रुपये, असा साठाही वाहनातून जप्त करण्यात आला. या तंबाखूसह सुमारे ५ लाख रुपये किमतीचे शेव्हरोलेट एन्जॉय वाहन जप्त करण्यात आले. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण ७ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

जप्त करण्यात आलेला तंबाखू प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर वाहन आणि जप्त मुद्देमाल देसाईगंज पोलिस ठाण्यात आणण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आणि पंचांच्या उपस्थितीत वाहनाची पाहणी करण्यात आली. त्यावेळी वाहनातून जप्त करण्यात आलेला साठा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोलीचे अन्न सुरक्षा अधिकारी सुरेश तोरेम यांच्या फिर्यादीवरून देसाईगंज पोलिस ठाण्यात आरोपी मनोहरलाल दासवानी आणि प्रमोद पटले यांच्याविरुद्ध अपराध क्रमांक ५८१/२०२६ नोंद करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता-२०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५ व ३(५), तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम-२००६ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि. राम साबळे करीत आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलिस अधीक्षक गोकुल राज जी., उपविभागीय पोलिस अधिकारी, कुरखेडा प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. देसाईगंज पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोनि. स्वप्नील ईज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली सपोनि. विजय गिते, पोउपनि. अनिल देरकर, परि. पोउपनि. राम साबळे तसेच पोलिस अंमलदार पठाण, कडव, तटलावर, सेलोटे, कसारे, बन्सोड आणि बांबोळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.





  Print






Related Photos