महत्वाच्या बातम्या

 भरधाव ट्रकच्या धडकेत पोलिस शिपायाचा दुर्दैवी मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : भरधाव ट्रकने मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पोलिस शिपायाचा मृत्यू झाला. ही घटना डुग्गीपार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील सावंगी परिसरात शुक्रवारी २ सायंकाळी ५ ते ५.३० वाजताच्या सुमारास घडली. ताराचंद दामाजी माहुरे (५७), रा. सेंदूरवाफा, ता. साकोली, जि. भंडारा, असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे.

मागून आलेल्या ट्रकची मोटारसायकलला धडक -
मिळालेल्या माहितीनुसार, ताराचंद माहुरे हे चंद्रशेखर मधुकर वंजारी (३३), रा. घाटबोरी/तेली, ता. सडक-अर्जुनी, यांच्यासोबत मोटारसायकल क्रमांक एमएच ३६-बी ८०२३ वरून प्रवास करीत होते. दोघे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरून सावंगी परिसरातून पश्चिमेकडे जात असताना मागून आलेल्या ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

या ट्रकचा चालक हरिश मोतीलाल सिन्हा (३०), रा. लक्ष्मीनगर, कळमना, नागपूर, हा सीडब्ल्यू १९३७ क्रमांकाचा ट्रक निष्काळजीपणे चालवत असल्याने त्याने मोटारसायकलला धडक दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

डोक्याला गंभीर दुखापत; उपचारापूर्वीच मृत्यू -
ट्रकच्या धडकेनंतर मोटारसायकलवरील ताराचंद माहुरे खाली पडले. या वेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदत करत त्यांना रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

ताराचंद माहुरे हे भंडारा जिल्ह्यातील सेंदूरवाफा येथील रहिवासी असून पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होते. कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखलव -
या प्रकरणी मिळालेल्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिस ठाण्यात ट्रक चालक हरिश मोतीलाल सिन्हा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (ब) आणि १०६ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची पुढील चौकशी डुग्गीपार पोलिस करीत असून, घटनेमागील परिस्थितीचा तपास सुरू आहे.





  Print






Related Photos