महत्वाच्या बातम्या

 आजी-आजोबांना भेटून वरोऱ्याला निघाली अन् अचानक गायब : १६ वर्षीय मुलीचा शोध सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : आजी-आजोबांना भेटण्यासाठी बल्लारपूरला आलेली १६ वर्षीय मुलगी वरोऱ्याला परत जाण्यासाठी घराबाहेर पडली; मात्र ती घरी पोहोचलीच नाही. वरोऱ्याला जाते असे सांगून निघालेल्या मुलीचा त्यानंतर संपर्क तुटल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. बल्लारपूर आणि वरोरा परिसरात शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नसल्याने अखेर बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी वरोरा येथे आपल्या नातेवाईकांकडे राहत होती. काही दिवसांपूर्वी तिने बल्लारपूर येथील आजी-आजोबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. कुटुंबीयांनी तिला लगेच जाण्यास मनाई केली असता ती भावनिक झाली होती. आजी-आजोबांना भेटण्यासाठी जाऊ दिले नाही तर जीवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकी तिने दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अखेर तिला बल्लारपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली.

त्यानंतर ती बल्लारपूर येथील राजेंद्र प्रसाद वॉर्डातील आजी-आजोबांच्या घरी पोहोचली. काही दिवसांनी १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास वरोऱ्याला जाण्यासाठी ती घरातून निघाली. घराबाहेर पडताना ती वरोऱ्याला जात असल्याचे सांगून निघाली होती. मात्र बराच वेळ उलटूनही ती वरोरा येथे पोहोचली नाही. तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही.

मुलगी घरी न पोहोचल्याचे समजताच कुटुंबीयांनी तिचा बल्लारपूर तसेच वरोरा परिसरात शोध सुरू केला. नातेवाईक, परिचित आणि संभाव्य ठिकाणी चौकशी करूनही तिचा काहीच मागमूस लागला नाही. वेळ जसजसा पुढे जात होता, तसतशी कुटुंबीयांची चिंता वाढत गेली. अखेर त्यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

मुलगी अल्पवयीन असल्याने तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून मुलीचा शोध सुरू केला आहे. कुटुंबीयांकडूनही तिचा शोध घेतला जात असून, मुलगी सुखरूप परत यावी, यासाठी नातेवाईकांकडून प्रयत्न सुरू आहेत.

पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव चव्हाण करीत आहेत.





  Print






Related Photos