महत्वाच्या बातम्या

 बँक खाते उघडण्याच्या बहाण्याने मजुराची फसवणूक : सायबर गैरव्यवहारासाठी खात्याचा वापर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : बँकेत खाते उघडून देण्याच्या बहाण्याने एका मजुराची कागदपत्रे आणि सिमकार्ड घेऊन त्याच्या बँक खात्याचा सायबर फसवणुकीसाठी गैरवापर केल्याचा प्रकार दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. या खात्यात १ लाख ४ हजार रुपयांची रक्कम आढळली असून, बँकेने खाते डेबिट फ्रिज केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यनगर, मेजरगेटजवळ, तुकूम येथील मिलिंद ज्ञानिराम नागदिवे ४३ वर्ष हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

२९ जुलै २०२६ रोजी ते बँक ऑफ महाराष्ट्रच्या तुकूम शाखेत खाते उघडण्यासाठी गेले असता, त्यांची ओळख असलेल्या अस्लम शब्बीर खान याने खाते उघडून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्याने आधारकार्ड, पॅनकार्ड, वीजबिल आणि नवीन सिमकार्ड घेतले. त्यानंतर बँकेत खाते उघडण्यात आले. मात्र, पासबुक, एटीएम कार्ड, चेकबुक आणि सिमकार्ड त्याच्याकडेच राहिले. मिलिंद नागदिवे यांनी वारंवार खात्याबाबत विचारणा केली असता, तो टाळाटाळ करीत होता. अखेर १८ नोव्हेंबर रोजी नागदिवे यांनी बँकेत जाऊन खात्याची माहिती घेतली असता, खात्यात १ लाख ४ हजार रुपये शिल्लक असल्याचे समजले. तसेच खाते डेबिट फ्रिज करण्यात आल्याचेही निदर्शनास आले.

बँकेच्या अधिकाऱ्यांनी खात्याचा वापर सायबर फसवणुकीसाठी झाल्याची माहिती दिली. याबाबत संबंधित व्यक्तीला फोन करून विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आपल्या बँक खात्याचा गैरवापर करून फसवणूक केल्याचा संशय नागदिवे यांनी व्यक्त केला. याप्रकरणी त्यांनी दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर करीत आहेत.





  Print






Related Photos