पत्ते खेळू न दिल्याच्या रागातून खून : आरोपीला जन्मठेप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : पत्ते खेळू न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून लोखंडी सुरीने वार करून एका व्यक्तीचा खून करणाऱ्या शक्ती टेकाम याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपीवर कलम ३०२ भादंवि तसेच भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा निकाल २४ सप्टेंबर २०२६ रोजी चंद्रपूर येथील न्यायालयात सुनावण्यात आला. शक्ती टेकाम असे आरोपीचे नाव आहे.
ही घटना ११ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास राजुरा तालुक्यातील बामणवाडा येथे घडली. मृतकाने आरोपी शक्ती टेकाम याला पत्ते खेळण्यास दिले नाहीत. याचा राग आल्याने टेकाम याने पत्ते खेळत असलेल्या ठिकाणी पाणी टाकले. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यावेळी संतप्त झालेल्या शक्ती टेकाम याने लोखंडी सुरीने मृतकाच्या पोटात वार करून त्याचा खून केला.
घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी तत्परतेने गुन्हा क्रमांक ५००/२०२२ अन्वये कलम ३०२ भादंवि व भारतीय हत्यार कायद्यातील कलम ४, २५ नुसार गुन्हा दाखल करून आरोपी शक्ती टेकाम याला अटक केली. तपासादरम्यान पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल तसेच परिस्थितीजन्य पुरावे संकलित केले. तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर येथे झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड सीमा रामटेके आणि ॲड पी. जी. घट्टुवार यांनी युक्तिवाद केला. सरकार पक्षाने सादर केलेले साक्षीपुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने शक्ती टेकाम याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा तसेच ५ हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे, पोलीस ठाणे राजुरा यांनी केला. न्यायालयीन पैरवीची जबाबदारी महिला पोलीस हवालदार ललिता शेंडे (ब.नं. १५५), पोलीस ठाणे राजुरा यांनी पार पाडली. दोषसिद्धी कक्ष, चंद्रपूर यांच्या समन्वयातून ही कार्यवाही पूर्ण करण्यात आली.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली.




Petrol Price




