चंद्रगड सिटूच्या १० व्या जिल्हा अधिवेशनात रमेशचंद्र दहिवडे अध्यक्ष, अरुण भेलके महासचिव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : कामगार व कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कायदेशीर तसेच रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स सिटूच्या चंद्रपूर-गडचिरोली संयुक्त जिल्हा संघटनेचे १० वे जिल्हा अधिवेशन चंद्रपूर येथील सिटू कार्यालय, जनसंघर्ष भवन येथे उत्साहात पार पडले. अधिवेशनात रमेशचंद्र दहिवडे यांची अध्यक्षपदी, तर अरुण भेलके यांची महासचिवपदी निवड करण्यात आली.
अधिवेशनाचे उद्घाटन किशोर जामदार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी रमेशचंद्र दहिवडे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये सिटूचे राज्य सचिव पंजाबराव गायकवाड, अमोल मारकवार, राजेश पिंजरकर, शारदा बावणे, सायली बावणे, प्रभा बावणे, निसार हाश्मी, विद्या निब्रड, सुनंदा बावणे, राज बनसोड, वामन मानकर आणि अरुण भेलके यांचा समावेश होता.
अधिवेशनाची सुरुवात लाल झेंड्याला वंदन करून शहीदांना सलामी देण्यात आली. लाल बावट्याच्या महात्म्यावर समूहगीत सादर करण्यात आले. त्यानंतर सिटूचे माजी राष्ट्रीय महासचिव सीताराम येचुरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन सत्राला सुरुवात झाली. उपस्थित पाहुण्यांचे रोपवाटिका, पुस्तके व गोधडी देऊन स्वागत करण्यात आले.
उद्घाटनपर भाषणात किशोर जामदार यांनी कामगार चळवळीचा इतिहास आणि कामगारांच्या संघर्षातून मिळालेल्या अधिकारांची माहिती दिली. सिटूचे राज्य सचिव पंजाबराव गायकवाड यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत कामगारांच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात रमेशचंद्र दहिवडे यांनी कामगारांनी शेकडो वर्षांच्या संघर्षातून मिळवलेले कामगार कायदे बदलले जात असल्याचे सांगत, या बदलांना विरोध करण्यासाठी कामगारांनी संघटितपणे लढा उभारण्याची गरज व्यक्त केली.
अधिवेशनात जागतिक, राष्ट्रीय व राज्यातील आर्थिक-राजकीय परिस्थितीचा अहवाल तसेच संघटनात्मक अहवाल सादर करण्यात आला. विविध प्रश्नांवर ठराव मंजूर करण्यात आले. त्यानंतर चंद्रगड सिटूची नवीन जिल्हा समिती निवडण्यात आली. नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी रमेशचंद्र दहिवडे, महासचिवपदी अरुण भेलके, कोषाध्यक्षपदी अनिल येनकर, सल्लागारपदी किशोर जामदार आणि कार्याध्यक्षपदी राजेश पिंजरकर यांची निवड झाली. सचिवपदी कॉ. अमोल मारकवार, संतोष धोटे, सुलभा पाटील, प्रमोद गोडघाटे आणि देवराव लोहकरे यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी शारदा लेनगुरे, सुनंदा बावणे, सायली बावणे, विठा भट आणि गुज डोंगे यांची निवड झाली. याशिवाय १६ कौन्सिल सदस्यांचीही निवड करण्यात आली. अधिवेशनाचे सूत्रसंचालन शारदा लेनगुरे यांनी केले, तर आभार सुरेखा तितरे यांनी मानले. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी वामन मानकर, गजानन इंगलवार, परशुराम तोंडासे, शरद ताजने, बंडू थेटे आणि मिता रंगारी यांनी परिश्रम घेतले.




Petrol Price




