वाढत्या कोरोनामुळे केंद्र सरकारचे सर्व राज्यांना पत्र


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
देशभरात एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत असतानाच महाराष्ट्र आणि केरळात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येने चिंता वाढली आहे. वाढता पॉझिटिव्हिटी दर, सक्रीय रुग्ण यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. अचानक वाढणाऱ्या या संख्येमुळे गृह मंत्रालयही चिंतेत आहे. याबाबत गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे.
गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, प्रशासनाने ज्या जिल्ह्यात कोरोना संक्रमित पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे त्यात प्रो एक्टिव कन्टेंन्मेंटसाठी पाऊल उचलावीत. संक्रमण कमी करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. उत्सव, सणांचे दिवस लक्षात घेता गर्दी होण्यापासून आळा घालावा. लोकांची गर्दी रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर सक्ती करा असेही त्यांनी म्हटले आहे.
तसेच आपल्याला कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी चाचणी, पडताळणी, लसीकरण आणि कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सोशल डिस्टेंसिंग पाळणे, मास्क घालणे, हात धुणे या मार्गदर्शक सूचनांचे पालन लोकांनी करायला हवे असे अजय भल्ला यांनी पत्रात म्हटले आहे. तर दुसरीकडे परराष्ट्र राज्यमंत्री वी मुरलीधरन यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरुन केरळ सरकारवर निशाणा साधला आहे.
वी मुरलीधरन म्हणाले की, केरळमध्ये कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याठिकाणी सरकार जनतेला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करते आहे. केरळमध्ये होम क्वारंटाईन अयशस्वी ठरले आहे. त्याचसोबत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणेही खूप कमी प्रमाणात होते. केरळ सरकारने राज्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ती पावले उचलने गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (२८ ऑगस्ट) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४६,७५९नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३,२६,४९,९४७ पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ४,३७,३७० वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी ३,५९,७७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ३,१८,५२,८०२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे.
आकडेवारीनुसार, शुक्रवारी गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ६५४ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत १७० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ३ हजार ३०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ५२ हजार १५० रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ५१ हजार ५७४ इतकी आहे.
  Print


News - World | Posted : 2021-08-28Related Photos