वर्ध्यात हर घर तिरंगा अभियानांतर्गत भव्य तिरंगा रॅली : ६०० जणांचा उत्स्फूर्त सहभाग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा अभियानांतर्गत वर्धा येथील शिक्षा मंडळ संचलित सर्व महाविद्यालयांच्या वतीने स्वातंत्र्यदिनी वर्धा ते बापू कुटीपर्यंत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. देशभक्तीच्या उत्साहात निघालेल्या या रॅलीत सुमारे ५०० विद्यार्थी आणि १०० प्राध्यापक व कर्मचारी सहभागी झाले. हातात तिरंगा ध्वज आणि देशभक्तीपर घोषणांनी रॅलीचा संपूर्ण मार्ग दुमदुमून गेला.
रॅलीपूर्वी बजाज विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी नशामुक्तीची शपथ घेतली. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी व सक्षम समाजनिर्मितीत योगदान द्यावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यानंतर शिक्षा मंडळाचे सभापती संजय भार्गव तसेच सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅलीला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले. बजाज विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणातून सुरू झालेली रॅली गांधी पुतळा चौक आणि सेवाग्राम रोडमार्गे बापू कुटीपर्यंत पोहोचली.
देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमला परिसर -
रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेत देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या घोषणा दिल्या. भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला. रॅलीच्या मार्गावर नागरिकांचेही लक्ष वेधले गेले. तिरंगा ध्वज आणि देशभक्तीच्या घोषणांमुळे संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीमय झाले होते.
हर घर तिरंगा सेल्फी उपक्रम -
राष्ट्रीय भावना अधिक दृढ करण्यासाठी यावेळी हर घर तिरंगा सेल्फी या उपक्रमाचेही विशेष आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसह प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेत तिरंग्याप्रती आदर आणि राष्ट्रप्रेम व्यक्त केले.
सात महाविद्यालयांचा सहभाग -
या तिरंगा रॅलीमध्ये शिक्षा मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या बजाज विज्ञान महाविद्यालय, गो. से. वाणिज्य महाविद्यालय, आचार्य श्रीमन्नारायण तंत्र निकेतन, बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय, बजाज कृषी महाविद्यालय आणि कृषी विज्ञान शाखा, पिंपरी या संस्थांतील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या रॅलीच्या माध्यमातून युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीची भावना जागृत करण्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि देशभक्तीपर वातावरणामुळे हर घर तिरंगा अभियानाला वर्ध्यात उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.




Petrol Price




