महाराष्ट्र युवा जलदूत देणार जलसंधारणाचा संदेश


इंस्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून युवकांची जलसंधारण जनजागृतीत भागीदारी; उत्कृष्ट तीन रिल्सना २५, १५ आणि १० हजारांचे पारितोषिक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : माती आणि पाणी ही मानवासह पशू-पक्षी, प्राणी, वनस्पती आणि संपूर्ण सजीवसृष्टीच्या अस्तित्वाची मूलभूत संसाधने आहेत. मात्र, बदलते हवामान, अनियमित पर्जन्यमान, भूजल पातळीतील घट आणि वाढता पाण्याचा वापर यामुळे या नैसर्गिक संपत्तीसमोर गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत. शेती, पर्यावरण आणि शाश्वत विकासासाठी मृद व जलसंधारणाची गरज अधोरेखित होत असताना, हा संदेश नव्या पिढीपर्यंत त्यांच्या भाषेत आणि त्यांच्या माध्यमातून पोहोचविण्यासाठी राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
युवकांच्या कल्पकतेला डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देत Reel for Soil and Water Conservation ही राज्यव्यापी इंस्टाग्राम रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील युवक-युवतींना महाराष्ट्र युवा जलदूत म्हणून जलसंधारणाचा संदेश समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याची संधी मिळणार आहे.एक रिल मातीसाठी एक रिल पाण्यासाठी एक रिल सुरक्षित भविष्यासाठी हा संदेश घेऊन राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये व शाळांमधील विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक, एनसीसी कॅडेट्स, नेहरू युवा केंद्राशी संबंधित युवक, क्रीडा व युवक संस्था, स्वयंसेवी संस्था, पर्यावरण संस्थांमध्ये कार्यरत युवक-युवती, इंस्टाग्राम क्रिएटर्स, यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्स या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
पाणी अडवा, पाणी जिरवा’पासून डिजिटल जनजागृतीपर्यंत -
राज्यातील अनेक भागांत खालावलेली भूजल पातळी लक्षात घेऊन पाणलोट विकास आणि भूजल पुनर्भरणाला चालना देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र दिला होता. त्यांच्या जलसंधारण क्षेत्रातील योगदानाचे स्मरण कायम राहावे, तसेच जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती व्हावी, यासाठी राज्य शासनाने ३ जुलै २०२६ रोजी शासन निर्णय काढून २१ ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये सप्ताहाच्या निमित्ताने विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून युवा पिढीच्या कल्पकतेला चालना देणारी ही रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
१५ ते ३० वयोगटातील युवकांसाठी स्पर्धा -
राज्यातील १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला ३० ते ६० सेकंदांची रिल तयार करावी लागणार आहे. रिलच्या सुरुवातीलाच तिचा उद्देश, स्पर्धकाचे नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे.तयार केलेली रिल पब्लिक इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करावी लागणार असून, पोस्ट करताना मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटला टॅग करणे आणि Save oil Save Water हा हॅशटॅग वापरणे अनिवार्य आहे. याशिवाय स्पर्धेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला क्यूआर कोड स्कॅन करून शासनाकडे सहभागाची नोंद करावी लागेल. त्यासाठी जिल्ह्यानुसार रिलची लिंक पेस्ट करावी लागणार आहे.
या विषयांवर करता येणार रिल -
स्पर्धकांना १५ ते १९ ऑगस्टदरम्यान जास्तीत जास्त तीन रिल्स अपलोड करता येणार आहेत. मातीची धूप रोखणे, पाणी बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळी, बंधारे, वृक्षारोपण, माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना, गावातील यशस्वी मृद व जलसंधारणाची कामे, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरण संवर्धन अशा विविध विषयांवर रिल्स तयार करता येतील.यासाठी अभिनय, संगीत, विनोद, लघुपट, ॲनिमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन दृश्ये किंवा अन्य नाविन्यपूर्ण माध्यमांचा वापर करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे युवकांना केवळ माहिती देण्याऐवजी प्रभावी आणि आकर्षक डिजिटल माध्यमातून जलसंधारणाचा संदेश मांडता येणार आहे.
लाईक्स नव्हे, आशय आणि कल्पकतेला महत्त्व -
स्पर्धेतील विजेते केवळ रिलला मिळालेल्या लाईक्स किंवा फॉलोअर्सच्या संख्येवर निश्चित केले जाणार नाहीत. परीक्षणासाठी एकूण १०० गुणांचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यात विषय व संदेशासाठी ३० गुण, कल्पकतेसाठी २५ गुण, प्रभावी सामाजिक संदेशासाठी २० गुण, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्तेसाठी १५ गुण, तर इंस्टाग्राम एंगेजमेंटसाठी १० गुण देण्यात येणार आहेत. या निकषांनुसार प्रत्येक जिल्ह्यातील सर्वोत्तम तीन रिल्सची निवड संबंधित जिल्हाधिकारी करतील. निवड झालेल्या विजेत्यांना महाराष्ट्र युवा जलदूत म्हणून गौरविण्यात येणार असून प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. यासोबत सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान केले जाणार असून उत्कृष्ट सहभागींना ई-प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
डिजिटल माध्यमातून उभी राहणार युवा जलसंधारण चळवळ -
माती आणि पाणी ही परस्परांशी जोडलेली नैसर्गिक संसाधने असून भविष्यातील पिढ्यांसाठी त्यांचे संरक्षण करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव युवकांमध्ये निर्माण करण्याबरोबरच त्यांचा डिजिटल प्रभाव जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी वापरण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. युवकांच्या कल्पकतेला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाल्यास इंस्टाग्रामवरील प्रत्येक रिल ही केवळ मनोरंजनाचे साधन न राहता माती, पाणी आणि सुरक्षित भविष्यासाठीचा प्रभावी जनजागृती संदेश ठरू शकतो. त्यामुळे राज्यातील युवा पिढी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन डिजिटल लोकचळवळीच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेश घराघरांत पोहोचवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




Petrol Price




