महत्वाच्या बातम्या

  वरोरा येथे कारची काच फोडून अडीच लाखांची रोकड लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : प्लॉट विक्रीचे व्यवहार आटोपून बँकेत चेक जमा करण्यासाठी गेलेल्या प्लॉट सेलरच्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने कारमधील २ लाख ५० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास केली. ही घटना गुरुवारी (२० ऑगस्ट) दुपारी वरोरा येथील एचडीएफसी बँकेच्या आंबेडकर चौक शाखेच्या कार पार्किंगमध्ये घडली.

याप्रकरणी माजरी येथील आंबेडकर वॉर्ड क्रमांक ४ मधील रहिवासी निलेश नथ्थुजी भेले (वय ३०) यांनी वरोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

भेले हे प्लॉट विक्रीचा व्यवसाय करतात. २० ऑगस्ट रोजी ते प्लॉट विक्रीच्या व्यवहारासाठी वरोरा येथील रजिस्टर कार्यालयात आले होते. त्यांनी अशोक कुळसंगे यांना प्लॉट विकल्यानंतर व्यवहाराच्या मोबदल्यात २ लाख ७० हजार रुपयांचा चेक आणि २ लाख ५० हजार रुपये रोख मिळाले. ही रोकड व चेक त्यांनी काळ्या रंगाच्या कॉलेज बॅगेत ठेवले.

यानंतर दुपारी सुमारे ३.४५ वाजता ते आपल्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनाने एचडीएफसी बँकेच्या आंबेडकर चौक शाखेत गेले. कार पार्किंगमध्ये वाहन लॉक करून ते चेक जमा करण्यासाठी बँकेत गेले. सायंकाळी ४ वाजता चेक जमा करून परत कारजवळ आले असता, ड्रायव्हर साईडच्या दरवाजाची काच फुटलेली आढळली.

कार उघडून पाहिल्यावर काळ्या रंगाची कॉलेज बॅग गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या बॅगेत २ लाख ५० हजार रुपयांची रोकड तसेच कास्ट व्हॅलिडिटी, डोमिसाइल, बोनाफाईड यांसह विविध महत्त्वाची कागदपत्रे होती.

रजिस्टर कार्यालयातून बाहेर पडताना दोन मुले आपल्यावर लक्ष ठेवून असल्याचा संशय भेले यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे. अज्ञात चोरट्याने कारची काच फोडून रोकड असलेली बॅग चोरून नेल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. वरोरा पोलिसांनी तक्रारीची नोंद घेत अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला आहे.





  Print






Related Photos