महत्वाच्या बातम्या

 विद्यार्थिनींनी नोकरीपुरते मर्यादित न राहता स्वयंरोजगाराकडे वळावे


- एसएनडीटी महिला विद्यापीठात सात दिवसीय रोजगार कौशल्य कार्यशाळेचा समारोप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींना रोजगाराच्या बदलत्या संधींची माहिती मिळावी तसेच नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये विकसित व्हावीत, या उद्देशाने एसएनडीटी महिला विद्यापीठ, बल्लारपूर केंद्र आणि महिंद्रा राईज-नांदी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सात दिवसीय रोजगार कौशल्य कार्यशाळेचा २ सप्टेंबर रोजी समारोप झाला. या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थिनींना रोजगारासाठी आवश्यक असलेल्या विविध कौशल्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सहायक प्राध्यापिका डॉ. प्राजक्ता धोटे यांनी विद्यार्थिनींना मुलाखत व संभाषण कौशल्य, आर्थिक नियोजन, वेळेचे व्यवस्थापन तसेच गुंतवणुकीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. बदलत्या रोजगाराच्या क्षेत्रात केवळ शैक्षणिक पात्रता पुरेशी नसून प्रभावी संवाद, आत्मविश्वास, वेळेचे नियोजन आणि आर्थिक शिस्त यांसारखी कौशल्येही महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे संचालक डॉ. राजेश इंगोले होते. त्यांनी विद्यार्थिनींनी केवळ नोकरीच्या शोधापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता स्वयंरोजगार आणि रोजगारनिर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन केले. स्वतःच्या कौशल्यांचा आणि उपलब्ध संधींचा योग्य वापर करून विद्यार्थिनींनी उद्योजकतेकडेही वळावे, असे त्यांनी सांगितले. सात दिवसांच्या या कार्यशाळेत विद्यार्थिनींना रोजगारासाठी आवश्यक कौशल्यांसोबतच आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीविषयीही मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे कार्यशाळा विद्यार्थिनींसाठी उपयुक्त ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थिनींना समारोप कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक प्राध्यापिका शीतल बिलोरे यांनी केले. यावेळी समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त, प्राध्यापकवृंद तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. विद्यार्थिनींमध्ये रोजगारक्षम कौशल्यांचा विकास करण्यासोबतच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने अशा कार्यशाळांचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.





  Print






Related Photos