महत्वाच्या बातम्या

 संस्कृता म्हणजे स्वतःमधील सप्तशक्ती ओळखून तिचा विकास करणे : डॉ. उज्वला चक्रदेव


- अजर्नी ऑफ बीइंग संस्कृता कार्यक्रमात विद्यार्थिनींना आत्मभान, नेतृत्व व जीवनमूल्यांची प्रेरणा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : प्रत्येक मुलीने स्वतःची खरी ओळख निर्माण करून आत्मचिंतनाची सवय लावावी. स्वतःमधील सप्तशक्ती ओळखून तिचा विकास करणे, हाच संस्कृता होण्याचा खरा अर्थ आहे, असे प्रतिपादन एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबईच्या कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव यांनी केले.एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर यांच्या वतीने बल्लारपूर येथील नाट्यगृहात आयोजित अ जर्नी ऑफ बीइंग संस्कृता या प्रेरणादायी संवाद कार्यक्रमात त्या विद्यार्थिनींशी संवाद साधत होत्या. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थिनींनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले, उपकुलसचिव व आवार समन्वयक डॉ. बाळू राठोड, समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविकात डॉ. राजेश इंगोले यांनी बल्लारपूर आवाराच्या वाटचालीचा आढावा घेतला. ग्रामीण व आदिवासी भागातील मुलींना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात या केंद्राची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी बल्लारपूर आवारातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. विद्यार्थिनींनी शिक्षणासोबत कौशल्य, चारित्र्य, शिस्त, सामाजिक उत्तरदायित्व व नेतृत्वगुण विकसित करून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवावे, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासाचे माध्यम मार्गदर्शन करताना डॉ. उज्वला चक्रदेव यांनी सुंदरता ही केवळ बाह्य रूपात नसून विचार, आचरण आणि व्यक्तिमत्त्वाच्या समृद्धीत असल्याचे सांगितले. शिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून व्यक्तिमत्त्व घडविण्याचे, मूल्यांची जपणूक करण्याचे आणि समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आत्मविश्वास, नेतृत्व, संवेदनशीलता, ज्ञान, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधण्याचा संदेश त्यांनी विद्यार्थिनींना दिला. विद्यापीठाच्या संस्कृता स्त्री पराशक्ती या ब्रीदवाक्याशी सुसंगत असलेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थिनींना आत्मभान व जीवनमूल्यांची नवी प्रेरणा मिळाली. इंटर्नशिप व रोजगार मिळविणाऱ्या विद्यार्थिनींचा सत्कारविद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना दरवर्षी इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षी विविध अभ्यासक्रमांतील अनेक विद्यार्थिनींना इंटर्नशिपची संधी मिळाली असून त्यापैकी अनेकांना नामांकित संस्थांमध्ये रोजगारही मिळाला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या यशाचे अभिनंदन केले.

कुलगुरू डॉ. चक्रदेव यांचा विशेष सन्मान कार्यक्रमाच्या निमित्ताने महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर परिवाराच्या वतीने कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ग्रामीण व आदिवासी भागातील मुलींना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे यावेळी कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सहायक प्राध्यापिका अपेक्षा पिंपळे व अश्विनी वाणी यांनी केले. उपकुलसचिव व आवार समन्वयक डॉ. बाळू राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.





  Print






News - Chandrapur




Related Photos