महत्वाच्या बातम्या

 स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत वृक्षारोपण : पर्यावरण संवर्धनाचा संदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : राज्याचे दिवंगत नेते तथा माजी उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अहेरी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात वृक्षारोपण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमाला अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणासाठी किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले.

वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवाई जपण्याची सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.याप्रसंगी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम, आलापल्ली वनविभागाच्या उपवनसंरक्षक दिपाली तलमले, उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ, उपविभागीय वनाधिकारी शिशुपाल पवार, वनपरिक्षेत्राधिकारी नारायण इंगळे यांच्यासह वन विभागातील अधिकारी, वनपाल, वनरक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांनी स्व. अजित पवार यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व यावरही मार्गदर्शन करण्यात आले. अहेरी परिसर अधिक हिरवागार करण्यासाठी वन विभागाच्या विविध उपक्रमांना लोकसहभागाची जोड मिळणे आवश्यक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप वृक्षसंवर्धनाची सामूहिक शपथ घेऊन करण्यात आला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos