महत्वाच्या बातम्या

 धान खरेदी केंद्रांवरील प्रलंबित धान तातडीने उचलावे : बंद केंद्रे सुरू करण्याची अशोक नेते यांची मुख्य सचिवांकडे जोरदार मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांच्या दोन दिवसीय गडचिरोली दौऱ्यादरम्यान माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी त्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर केले. यामध्ये विशेषतः धान खरेदी केंद्रांवरील प्रलंबित धान तातडीने उचलून बंद पडलेली धान खरेदी केंद्रे पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले की, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक धान खरेदी केंद्रांवर मागील हंगामात खरेदी केलेले धान अद्यापही मोठ्या प्रमाणावर पडून आहे. शासनाकडून वेळेत उचलणी न झाल्यामुळे नवीन हंगामातील धान खरेदी प्रक्रियेस अडथळे निर्माण होत असून शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक केंद्रांवर साठवणुकीसाठी पुरेशा गोदामांची कमतरता असल्याने हजारो क्विंटल धान उघड्यावर ठेवण्यात आले आहे.

सध्या मान्सून हंगामाला सुरुवात झाल्याने उघड्यावर पडून असलेल्या धानाचे पावसामुळे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताला धोका निर्माण झाला असून शासनाने तातडीने धान उचलणी मोहीम राबवावी, अतिरिक्त साठवणूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी आणि बंद असलेली तसेच प्रलंबित धान खरेदी केंद्रे त्वरित सुरू करावीत, अशी मागणी अशोक नेते यांनी केली.

यावेळी त्यांनी जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या मार्कंडा देवस्थानाच्या विकासकामांचा मुद्दाही मुख्य सचिवांच्या निदर्शनास आणून दिला. पुरातत्त्व विभागामार्फत निधी मंजूर झाल्यानंतरही विकासकामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे सांगत संबंधित विभागाला आवश्यक निर्देश देऊन कामांना गती देण्याची मागणी करण्यात आली.

याशिवाय गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास पॅकेज जाहीर करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली. शिक्षण, आरोग्य, रस्ते, सिंचन, उद्योग, पर्यटन, मोबाईल नेटवर्क, इंटरनेट सुविधा आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल व दुर्गम जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाने विशेष प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगताना अशोक नेते यांनी धान खरेदी केंद्रांचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे अधोरेखित केले. प्रलंबित धानाची तातडीने उचलणी न झाल्यास हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते, त्यामुळे या विषयावर त्वरित निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी मुख्य सचिवांना सांगितले.

दरम्यान, मुख्य सचिवांनी सादर करण्यात आलेल्या सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेतल्या असून विशेषतः धान खरेदी केंद्रांशी संबंधित प्रश्नावर तातडीने लक्ष देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताशी निगडित प्रश्नांवर शासन स्तरावर सकारात्मक कार्यवाही होईल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos