महत्वाच्या बातम्या

 कर्जमाफी योजनेच्या प्रोत्साहनपर लाभासाठी काँग्रेसची तहसील कार्यालयावर धडक


- तहसीलदारांना निवेदन : पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचा लाभ देण्याची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार समर्थ क्षीरसागर यांना निवेदन सादर केले. पात्र असूनही लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

राज्य शासनाच्या २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पीक कर्जाची उचल करून त्याची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद आहे. आर्थिक वर्ष संपल्यानंतर ३० जूनपूर्वी अथवा संबंधित बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित मुदतीत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली.

 परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दोन लाखांचा लाभ द्या -

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात अल्पमुदतीचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ मिळणार असून, संबंधित कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणे आवश्यक असल्याचे शासन निर्णयात नमूद आहे. पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांनी शासनाने निश्चित केलेल्या अटी व निकषांची पूर्तता केली आहे. मात्र, पात्रता पूर्ण करूनही अनेक शेतकरी अद्याप प्रोत्साहनपर लाभापासून वंचित असल्याचा दावा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केलाया पार्श्वभूमीवर संबंधित विभागाशी समन्वय साधून पात्र शेतकऱ्यांना तातडीने जास्तीत जास्त दोन लाख रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांशी दुजाभावाचा आरोप -

गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी विविध संकटांचा सामना करीत असतानाही अनेक शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करीत आहेत. मात्र, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांचा लाभ आणि कर्ज थकीत ठेवणाऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, असा निर्णय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय करणारा व दुजाभाव करणारा असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि शासनाच्या योजनेपासून पात्र शेतकरी वंचित राहू नयेत, यासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी निवेदनकर्त्यांनी तहसीलदारांकडे केली.

काँग्रेसचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित -

तहसीलदार समर्थ क्षीरसागर यांना निवेदन देताना काँग्रेसच्या शिष्टमंडळात पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज वसू, संचालक मनीष खडसे, अमर तीनघसे, रवींद्र चौधरी, हरीश ओझा, अरुण लाहुरे, संजय बोबडे, जय वाकडे, नगर काँग्रेस अध्यक्ष अजय देशमुख यांच्यासह सुनील बासू, पवन महाजन, नितीन महल्ले, सुरेश वैद्य, कुणाल कांबळे, मिहीर शेलट तसेच काँग्रेसचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. 





  Print






News - Wardha




Related Photos