महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यात ८२८ शिक्षकांची भरती


- पवित्र पोर्टल वर पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ,११ ऑगस्टपर्यंत लॉक करणे बंधनकारक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील शिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला असून, पवित्र पोर्टल च्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ८२८ शिक्षक पदांची भरती करण्यात येणार आहे. राज्यभरात एकूण ३० हजार २०९ रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना पदनिहाय पसंतीक्रम नोंदविण्याची सुविधा ६ ऑगस्टपासून उपलब्ध करून देण्यात आली असून, ११ ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम लॉक करणे अनिवार्य आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती. या चाचणीतील प्राप्त गुणांच्या आधारे इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या रिक्त शिक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. संबंधित व्यवस्थापनातील उपलब्ध रिक्त पदे तसेच शासनाने निश्चित केलेले आरक्षण विचारात घेऊन एकूण रिक्त पदांपैकी ८० टक्के पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे.

प्राथमिक विभागात सर्वाधिक संधी - 

गडचिरोली जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या ८२८ पदांमध्ये प्राथमिक शिक्षक पदांचा मोठा वाटा आहे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी तब्बल ८१५ पदे उपलब्ध आहेत. याशिवाय इयत्ता सहावी ते आठवीसाठी ९ पदे, तर इयत्ता नववी ते दहावीसाठी ४ पदे भरण्यात येणार आहेत.

वर्ग पदसंख्या -
इयत्ता १ ली ते ५ वी ८१५
इयत्ता ६ वी ते ८ वी ९
इयत्ता ९ वी ते १० वी ४
एकूण        ८२८

६ ऑगस्टपासून पसंतीक्रमाची सुविधा - 

पवित्र पोर्टलवर पात्र उमेदवारांना ६ ऑगस्टपासून पदनिहाय पसंतीक्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. उमेदवारांनी आपल्या लॉगिनद्वारे अधिकृत पोर्टलवर प्रवेश करून उपलब्ध पदांचा प्राधान्यक्रम जनरेट करायचा आहे. त्यानंतर पात्रतेनुसार पदनिहाय पसंतीक्रम नमूद करून तो निश्चित करणे आवश्यक आहे.उमेदवारांनी उपलब्ध पदे, संबंधित व्यवस्थापन, आरक्षण आणि स्वतःची पात्रता यांचा विचार करून पसंतीक्रम भरावा. पसंतीक्रमाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो ११ ऑगस्टपर्यंत लॉक करणे बंधनकारक आहे. त्यामुळे अंतिम मुदतीपूर्वीच प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मुलाखतीशिवाय गुणवत्ता यादी - 

पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या भरती प्रक्रियेची मुलाखतीशिवाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे तसेच शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे.

अडचणी असल्यास ई-मेलद्वारे कळवा - 

पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम नोंदविताना किंवा पदभरतीच्या प्रक्रियेत काही तांत्रिक अथवा अन्य अडचणी निर्माण झाल्यास उमेदवारांनी त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. संबंधित अडचणी ई-मेलद्वारे मांडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.११ ऑगस्टची अंतिम मुदत लक्षात घेता पात्र उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची प्रतीक्षा न करता पसंतीक्रम नोंदवून लॉक करावा, असे आवाहन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos