महत्वाच्या बातम्या

 व्यसनमुक्तीसाठी मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालयाचे विद्यार्थिनींनी घेतला संकल्प


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे मिशन स्पंदन व ब्रह्मकुमारीज, बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमात प्रमुख वक्त्या बी.के. स्मिता दीदी आणि बी.के. विनोद जी यांनी तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्यपान तसेच विविध अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम विद्यार्थिनींना सोप्या भाषेत समजावून सांगितले. व्यसनांपासून दूर राहून निरोगी व आनंदी जीवन जगावे तसेच कुटुंब आणि समाजामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका असमा खान यांनी विद्यार्थिनींना व्यसनमुक्तीसोबतच चारित्र्य, संस्कार आणि संस्कृती यांचे महत्त्व पटवून दिले. चांगले विचार, सकारात्मक दृष्टिकोन आणि सुसंस्कार यांच्या माध्यमातून सक्षम समाजाची निर्मिती करता येते, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला बी.के. स्मिता दीदी, बी.के. विनोद भाईजी, बी.के. डॉ. क्षमा बहन तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका असमा खान यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन वंदना किसान यांनी केले.

या जनजागृती अभियानात विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचा आणि समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याचा संकल्प केला.





  Print






News - Chandrapur




Related Photos